फसवणूक प्रकरणात सहा अटकेत
By Admin | Updated: July 19, 2014 23:54 IST2014-07-19T23:54:19+5:302014-07-19T23:54:19+5:30
नागपूरलगत असलेल्या कोराडी महाऔष्णिक वीज केंद्रात नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून बनावट दस्तऐवजांच्या आधारे बेरोजगारांची लाखो रूपयांनी फसवणूक करणाऱ्या

फसवणूक प्रकरणात सहा अटकेत
देसाईगंज : नागपूरलगत असलेल्या कोराडी महाऔष्णिक वीज केंद्रात नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून बनावट दस्तऐवजांच्या आधारे बेरोजगारांची लाखो रूपयांनी फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे आरोपी अटक होण्याची शक्यता असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मनोज दिनेवार, चंद्रशेखर मोरकर, सुहास बांबोडे, विनोद तागडे, आशिष घडसापुरे, गजानन भारूरकर सर्व रा. घडेगाव ता. सावनेर जि. नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे देसाईगंज येथील कस्तुरबा वार्डातील एका ओळखीच्या नागरिकाच्या घरी येऊन कोराडी औष्णिक वीज केंद्राचे बनावट ओळखपत्र व जॉयनिंग आॅर्डर बनविले. सदर बनावट दस्तऐवज देऊन अमोल भैसारे, पुलाला दाबनकर, रितेश धाकडे, सुमित्रा चंदनखेडे, ममता मोरकर, प्रवीण खोब्रागडे, प्रज्ञा खोब्रागडे यांच्याकडून प्रत्येकी दोन ते साडेतीन लाख रूपये घेतले. एकूण १८ लाख ३० हजार रूपये घेऊन ते पसार झाले.
काही दिवस लोटूनही नोकरीचा पत्ता नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अमोल भैसारे या युवकाने देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार केली. तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७०, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगाने चक्रे फिरवीत सहाही आरोपींना नागपूर येथे अटक केली आहे. या सर्व आरोपींना देसाईगंज येथील प्रथम सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ज्याच्या घरी हा सर्व व्यवहार झाला, त्याही नागरिकावर संशय व्यक्त केला जात आहे. त्याचाही या गुन्ह्यात समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याही नागरिकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)