सीमेला दारू दुकानांचा वेढा
By Admin | Updated: June 21, 2014 23:56 IST2014-06-21T23:56:49+5:302014-06-21T23:56:49+5:30
गडचिरोली हा दारूबंदी असलेला राज्यातला दुसरा जिल्हा आहे. मात्र गडचिरोलीत अवैध मार्गाने शेकडो लिटर दारू दररोज विकली जात आहे. दारूबंदी असलेल्या या जिल्ह्याच्या सिमेलगत जवळजवळ

सीमेला दारू दुकानांचा वेढा
दारूबंदीची जिल्ह्यात ऐसीतैसी : उत्पादन शुल्क विभाग परवाने वितरणासाठी मेहरबान
गडचिरोली : गडचिरोली हा दारूबंदी असलेला राज्यातला दुसरा जिल्हा आहे. मात्र गडचिरोलीत अवैध मार्गाने शेकडो लिटर दारू दररोज विकली जात आहे. दारूबंदी असलेल्या या जिल्ह्याच्या सिमेलगत जवळजवळ ३० ते ३५ परवानाप्राप्त दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी केवळ कागदावरच उरली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी जिल्ह्याच्या सीमेवर दारू दुकान व बिअरशॉपी मंजूर करण्याचे काम पुढारपण घेऊन करीत असल्याने गडचिरोली जिल्ह्याचे सामाजिक जीवन धोक्यात आले आहे.
१९९३ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता राजरोस अवैध दारूची विक्री केली जात आहे. या जिल्ह्याच्या चारही सिमालगत परवाना प्राप्त ३० दारू दुकानांचा वेढा पडला आहे. त्यामुळे या भागात जाऊन जिल्ह्यातील दारूडे आपली दारूची भूक भागवून घेत आहे. त्यामुळे सध्यातरी गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीचे तीनतेरा वाजले आहे.
जिल्ह्याच्या सिमेला लागून चंद्रपूर, छत्तीसगड, आंध्रप्रदेश व भंडारा, गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे. चंद्रपूर, गडचिरोली दरम्यान सावली तालुक्याच्या सीमेत तीन परवाना प्राप्त बीअर बार चालविले जातात. आष्टीजवळ गोंडपिंपरी तालुक्याच्या सिमेत विठ्ठलवाडा, तारसा येथे प्रत्येकी एक तर वैनगंगा नदीच्या तीरावर एक बार व एक देशी दारूचे दुकान सध्या सुरू आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेला लागून असलेल्या आरमोरी तालुक्यालगत ७ दुकानाचा वेढा आहे. पाचगाव येथे २ तर गांगलवाडी येथे ३ परमीट रूम, २ बिअर शॉपी आहेत. देसाईगंज तालुक्याला लागून भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर भागात ९ बिअर बार आहे. तर कोरची तालुक्याला लागून गोंदिया जिल्ह्याच्या सिमेत एवढेच परवाना प्राप्त दारू दुकान आहे. सिरोंचा तालुक्याला लागून आंध्रप्रदेशची सीमा आहे. कालेश्वर या आंध्रप्रदेश राज्याच्या गावात तेथील सरकारचे परवाना प्राप्त दारू दुकान आहे. या दारू दुकानदाराने गोदावरी नदीच्या पात्रात विस्तारीत कक्ष म्हणून दारू दुकान सुरू केले आहे. येथून सिरोंचा तालुक्यातील लोक चोरट्या मार्गाने दारू आणतात. राज्याच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या सिमेलगत नवे दुकान सुरू करताना काळजी घेण्याची गरज होती. परंतु दारू विक्रेत्यांच्या लॉबीवर सरकारी यंत्रणा मेहरबान झाली आहे. त्यामुळे राजरोसपणे दारूचे दुकान सिमेलगतच्या भागात सुरू करण्यात येत आहे. गडचिरोली शहरात वास्तव्याला असलेल्या काही दारूतस्करांनी आता सिमेलगतचे बार चालविण्यासाठी घेतले आहे व त्यांच्या धंद्याचा पसारा बंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही वाढविला जात आहे.
गडचिरोली पोलीस व उत्पादन शुल्क विभाग सीमेपार चालणाऱ्या दारूच्या या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहे. काही वर्षांपूर्वी गडचिरोली येथे महिलांच्या संघटनेने दारूबंदीसाठी आंदोलनही केले होते. मात्र आता या संघटनाही या प्रश्नावर मौन बाळगुण आहेत. जिल्ह्याची दारूबंदी हटवावी, अशी मागणी करणारेही महाभाग जिल्ह्यात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)