धक्कादायक ! दारुविक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर : दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत दारुतस्करी
By संजय तिपाले | Updated: June 19, 2025 14:39 IST2025-06-19T14:38:34+5:302025-06-19T14:39:11+5:30
Gadchiroli : चंद्रपूर जिल्ह्यातील महिला पोलिसांच्या ताब्यात

Shocking! Use of minors to sell liquor: Liquor peddlers in Gadchiroli, where liquor is banned
संजय तिपाले
गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत दारुतस्करी, विक्री नवीन नाही. मात्र, दारुची विक्री करण्यासाठी पोटच्या मुलासह इतर काही अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे १९ जून रोजी उजेडात आले. याबाबत १८ जून रोजी गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदवून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला मूळची चंद्रपूरच्या सावलीतील रहिवासी आहे. १७ जून रोजी रात्री आठ वाजता जिल्हा रुग्णालयासमोर चंद्रपूर रोडवरील फूटपाथवर दोन व्यक्तींमध्ये हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पो.नि. विनोद चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना रवाना केले. यावेळी पोलिसांना पाहून 'दारु का माल लेके भाग..' असे महिलेने एका अल्पवयीन मुलाला सांगितले. त्यानंतर तो दारुची पिशवी घेऊन पळून गेला. दरम्यान, तेथे जावेद खान (रा. गाेकुळनगर, गडचिरोली) याच्या हातात चाकू होता, तो संजय सडमेक (रा . सावली जि. चंद्रपूर) यास मारहाण करत होता. पोलिसांना पाहून जावेद खान जिल्हा परिषदेच्या दिशेने पळाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन त्यास पकडले तर संजय सडमेक किरकोळ जखमी आढळला. त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर दोघांनाही ठाण्यात आणले. हवालदार संजय पोल्लेलवार यांच्या फिर्यादीवरुन जावेद खान, संजय सडमेक यांच्याविरुध्द सार्वजनिक ठिकाणी मारहाण करुन शांतता भंग केल्याचा तर महिलेविरुध्द अल्पवयी मुलांकरवी दारुविक्री केल्याचा ठपका ठेऊन गुन्हा नोंदविण्यात आला.
महिला सराईत, डझनभर गुन्हे
१७ जून रोजी रात्री ही महिला स्वत:हून पोलिस ठाण्यात आली. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अल्पवयीन मुलांचा दारुविक्रीसाठी वापर केल्याची कबुली तिने दिली. स्वत:च्या अल्पवयीन मुलासह इतर काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरुन ती चंद्रपूर मार्गावर हातगाडा लावायची. तेथून ती दारुची विक्री करत असे. ती सराईत असून तिच्यावर दहा ते बारा गुन्हे नोंद आहेत.
न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवारातही विक्री
हवालदार संजय पोल्लेलवार यांच्या फिर्यादीनुसार, सदरील महिला अल्पवयीन मुलांकरवी जिल्हा न्यायालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या परिसरातही दारुची विक्री करायची. कुरखेडा न्यायालय आवारात १८ जून रोजी एका वकिलाचा वाहनालक मद्यपान करताना आढळला. त्यानंतर अल्पवयीन मुलांचा दारुविक्रीसाठी वापर केल्याने दारुबंदीचे नागडे सत्यही समोर आले आहे.