जिल्ह्यात देसाईगंजची शरयू, मुलचेराचा स्नेहानशू आणि गडचिरोलीची संजना आले अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:06 IST2025-05-06T16:05:49+5:302025-05-06T16:06:55+5:30
Gadchiroli : शरयू म्हणतेयं, इंजिनियर होणार...अधिकारी होण्याचे स्नेहानशूचे स्वप्न तर संजनाला व्हायचेयं डॉक्टर...

Sharyu from Desaiganj, Snehanshu from Mulchera and Sanjana from Gadchiroli are toppers in the district.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बारातीच्या बोर्डाच्या परीक्षेत यंदा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. देसाईगंज येथील महात्मा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी शरयू विलास ढोरे हिने ९२ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वलस्थान पटकावले.
मुलचेरा तालुक्याच्या सुंदरनगर येथील नेताजी सुभाष बोस उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी स्नेहानशू संजीव सरकार याने ९१. १७टक्के तर गडचिरोली येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजना कालिदास पदा हिने १०.६७ टक्के गुण घेऊन चमकदार कामगिरी बजावली.
तसेच गडचिरोली येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी जागृती जगदीश मेश्राम आणि चामोर्शी येथील राजर्षी शाहू महाराज स्कूल ऑफ सायन्सचा विद्यार्थी प्रिन्स रवींद्र वडेट्टीवार या दोघांनी ८९.८३ इतके समान गुण प्राप्त करून चमकदार कामगिरी केली.
शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील एमसीव्हीसी शाखेतून मदिहानाज पठाण हिने ८५.६७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात बाजी मारली. मनात जिद्द, चिकाटी आणि ध्येय निश्चित करून त्याला परिश्रमाची जोड दिली तर यश हमखास मिळते, हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. यंदाच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींनीच आपला दबदबा कायम ठेवला. या गुणवंतांवर शिक्षक, कुटुंबिय, नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शरयू म्हणतेयं, इंजिनियर होणार...
एम.एस.सी. अँग्री करून बायोटेक्नॉलॉ क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार जिल्ह्यातून अव्वल आलेल्या शस्यू ढोरे हिने 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केला. मला इंजिनिअर व्हायचे आहे, असे तिने सांगितले. महात्मा गांधी शाळा व ज्यू सायन्स कॉलेजच्या शिक्षकांनी व पालकांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळविणे शक्य झाले, अशी प्रांजळ कबुली तिने दिली. अभ्यासात सातत्य, नियोजनबध्द सराव तसेच पेपर सोडविण्याची प्रॅक्टिस यामुळे हे यश मिळाल्याचे तिने सांगितले.
अधिकारी होण्याचे स्नेहानशूचे स्वप्न
बीएसस्सीचे शिक्षण पूर्ण करून प्रशाकीय सेवेत जायचे आहे त्याला भविष्यात देशसेवा करायची आहे, असे सांगत आयएएस किंवा आयपीएस होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा स्नेहानशू संजीव सरकार याने बोलून दाखविली. स्नेहानशू संजीत सरकार याचे प्राथमिक शिक्षण सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा येथे झाले. त्याचे वडील हे पेशाने शिक्षक आहे व आई गृहिणी आहे. मूलचेरा येथील कॉन्व्हेंटमध्ये १० वीत सुद्धा तो तालुक्यातून प्रथम आला होता.
संजनाला व्हायचेयं डॉक्टर...
गडचिरोली येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी संजना कालिदास पदा हिने २०.६७ टक्के गुण घेऊन नावलौकिक मिळवला. डॉक्टर बनून रूग्णांची सेवा करायची आहे, असा मानस संजनाने व्यक्त केला. सुरूवातीला नीट परीक्षेची तयारी नियोजनबध्द केली असून सदर पेपरही उत्तम गेला आहे. त्यामुळे तिला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे. गडचिरोलीत राहून स्थानिकांची सेवा करायची आहे, असे तिने सांगितले.