दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा; घटनास्थळी आला आढळून मोठा शस्त्रसाठा
By संजय तिपाले | Updated: October 4, 2024 17:23 IST2024-10-04T17:23:10+5:302024-10-04T17:23:54+5:30
जोरदार धुमश्चक्री : घटनास्थळी आढळला मोठा शस्त्रसाठा

Seven Naxalites killed in South Abuzmad; A large stockpile of weapons was found at the scene
गडचिरोली : छत्तीसगडच्या दंतेवाडा- नारायणपूर सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये जवान व नक्षल्यांत ४ ऑक्टोबरला जोरदार धुमश्चक्री उडाली. यात सात नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.
गडचिरोलीपासून अडीचशे किलोमीटरवर हे घटनास्थळ आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा व नारायणपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये काही नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती छत्तीगडच्या सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे नक्षल्यांविरोधात अभियान राबविले. यावेळी अचानक जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला. जवानांनी नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर परिसरात झडती घेतली असता सात नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. तेथे एके-४७, एसएलआरसह इतर नक्षल शस्त्र व साहित्य आढळून आले. ते जवानांनी ताब्यात घेतले आहे.त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. सर्व जवान सुरक्षित आहेत.
गडचिरोली कनेक्शनची चौकशी सुरु
दरम्यान, अबूझमाड हा नक्षल्यांचा बालेकिल्ला असून गडचिरोलीत तेथूनच मोठ्या प्रमाणात घातपाती कारवायांचा कट रचला जातो. या पार्श्वभूमीवर शेजारच्या छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सात नक्षल्यांचे गडचिरोली 'कनेक्शन' आहे का, याची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
"या चकमकीबाबत माहिती मिळाली आहे, पण अद्याप संबंधित नक्षल्यांचा गडचिरोलीशी संबंध असल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरु आहे."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
बालेकिल्ल्यातच हादरा
अबूझमाडच्या जंगलात माओवाद्यांची नेहमीच हुकूमत राहिलेली आहे. मात्र, दक्षिण अबूझमाडमध्ये छत्तीसगडच्या जवानांनी सात नक्षल्यांनला कंठस्नान घालून माओवाद्यांना मोठा हादरा दिला आहे. या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.