सात कोटींचा महसूल बुडाला
By Admin | Updated: August 30, 2014 01:25 IST2014-08-30T01:25:55+5:302014-08-30T01:25:55+5:30
गतवर्षी सप्टेंबर २०१३ मध्ये खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील एकूण ८७ योग्य रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली.

सात कोटींचा महसूल बुडाला
दिलीप दहेलकर गडचिरोली
गतवर्षी सप्टेंबर २०१३ मध्ये खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील एकूण ८७ योग्य रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र खनिकर्म व पर्यावरण विभागाच्या अधिक करामुळे कंत्राटदारांनी रेतीघाटाच्या लिलाव प्रकियेकडे पाठ दाखविली. यामुळे ८७ पैकी केवळ ३१ रेतीघाटाची विक्री झाली. तर ५६ रेतीघाट अविक्रीत राहिले. परिणामी या रेतीघाटातून मिळणारा ६ कोटी ७७ लाख ९१ हजार ६४७ रूपयाचा महसूल बुडाल्याची माहिती उघडकीस आली आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक रेतीघाट रिकामेच आहेत.
गतवर्षी जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलाव प्रक्रियेसाठी जिल्हा खनिकर्म विभागाने संबंधीत तलाठ्यांकडून प्रस्ताव मागविले. आलेल्या रेतीघाटाच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेमार्फत या रेतीघाटांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. सदर सर्व्हेक्षणाचे काम जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावतीने एप्रिल व मे महिन्यात करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात रेतीघाटाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. सर्व्हेक्षणाअंती गडचिरोली, सिरोंचा, अहेरी, आरमोरी, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी, मुलचेरा व धानोरा आदी ११ तालुक्यातील ८७ रेतीघाट योग्य दर्शविण्यात आले. या रेतीघाटाची लिलावा प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आली. मात्र कराचा भरणा अधिक करावा लागत असल्याने अनेक रेतीघाट कंत्राटदारांनी या लिलाव प्रक्रियेला पाठ दाखविली. यामुळे केवळ ३१ रेतीघाट लिलावात कंत्राटदारांना विक्री करण्यात आले. या ३१ रेतीघाटाच्या माध्यमातून खनिकर्म विभागाला ३ कोटी ६९ लाख ७७ हजार ६५३ रूपयाचा महसूल मिळाला. रेतीघाटाचे कंत्राट घेण्यासाठी कंत्राटदारांना २ टक्के रक्कम बँक सुरक्षा, १० टक्के व्हॅट , २ टक्के आयकर, २० टक्के सुरक्षा ठेव अनामत रक्कम व ५ हजार रूपयाचे शुल्क भूजल सर्व्हेक्षण विभागाकडे अदा करावे लागते. तसेच प्रशासनाने ठेवलेल्या रेतीघाटाच्या किंमतीची रक्कम शासनाकडे अदा करावी लागते. रेतीघाटाच्या किंमतीपेक्षा २५ ते ३० हजार रूपये अधिकचे अदा करावे लागते.