Setu Bharatam plans laid down | सेतू भारतम् योजना रखडली

सेतू भारतम् योजना रखडली

ठळक मुद्देचार वर्ष उलटले : देसाईगंजात बायपास की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
सावंगी : साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या नवघोषित राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते परिवहन व राष्ट्रीयमहामार्ग मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. सेतू भारतम् योजना म्हणून थाटामाटात योजना सुरू करण्यात आली. परंतु चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे देसाईगंज शहरात बायपास मिळणार की फ्लॉयओव्हर याबाबत संभ्रम आहे.
साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदा उघडली होती. राष्ट्रीयमहामार्गाच्या नूतनीकरणासाठी १६२.२२ कोटी निधी मंजूर होता. सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम अद्यापही कासवगतीने सुरूच आहे. सदर मार्गाला शहरी भागातून की बायपास असे दोन प्रस्ताव जनतेसमोर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रूंद राहणार, याबाबतही नागरिकांमध्ये शंका आहे.
भूमिगत रेल्वे पुलाच्या अप्रोच रस्त्यावरून केवळ दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, कार आदी वाहने आवागमन करू शकतात. रेल्वे पुलाची उंची ३.६० मीटर असल्याने येथून मोठी उंच वाहने जाऊ शकत नाही. वडसा-वडेगाव रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे फाटक २४ जुलै २०१७ पासून देसाईगंज-साकोली राष्ट्रीय महामार्ग कायम बंद करून नवनिर्मित भूमिगत पुलावरून मर्यादित उंचीच्या उपमार्गावर दळणवळण वळते करण्यात आले होते. परंतु येथून मोठी व जड वाहने आवागमन करू शकत नाही. त्यामुळे वडसा-ब्रम्हपुरी रेल्वे मार्गावरील विर्सी कब्रस्तान शासकीय विश्रामगृहाकडे निघणाऱ्या राज्य महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु सदर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे.
देसाईगंज येथील वाढती वाहतूक लक्षात घेता शहरात फ्लॉयओव्हर निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची पूर्तता कधी होणार, याकडे देसाईगंज शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

१० ते १२ वेळा प्रभावित होते वाहतूक
देसाईगंज येथील बायपास की फ्लॉयओव्हर हा मुद्दा सध्यातरी संपुष्ठात आलेला नाही. साकोली-देसाईगंज-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा या राज्य मार्गाला ३५३ सी राष्ट्रीय महामार्ग घोषित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. देसाईगंज शहर चांदाफोर्ट-गोंदिया-वडसा रेल्वे क्रॉसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेला आहे. एका भागात रहिवासी तर दुसºया भागात मुख्य बाजारपेठ आहे. परिणामी रहिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना बाजार परिसरात वारंवार कामानिमित्त जावे लागते. मात्र शहराच्या मधोमध दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे लाईन गेल्यामुळे दिवसातून १० ते १२ वेळा रेल्वे फाटक बंद होते. नागरिकांना ताटकळत राहावे लागते.

आत्तापर्यंत केंद्र शासनाने देसाईगंज शहराला बायपास अथवा फ्लॉयओव्हरसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही.
- संजीव जगताप, उपकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, भंडारा.

Web Title: Setu Bharatam plans laid down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.