सुभाषग्राम - घोट मार्गावर गंभीर अपघात ; दुचाकी झाडावर आदळून दोन भावंडांसह तिघे ठार
By संजय तिपाले | Updated: April 17, 2025 17:10 IST2025-04-17T17:08:19+5:302025-04-17T17:10:54+5:30
सुभाषग्राम - घोट मार्गावरील घटना : अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट

Three people, including two siblings, killed after bike hits tree
संजय तिपाले
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील सुभाषग्राम - घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. यात तिघे ठार झाले. १७ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
साहेब सुभाशिष चक्रवर्ती (१६), सौरभ सुभाशिष चक्रवर्ती (२०, दोघे रा. वसंतपूर ता. चामोर्शी) व विशाल भूपाल बच्छाड (१९,रा. शिरपूर क्र.१० तेलंगणा) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे जण वसंतपूर येथून घोटकडे दुचाकीने जात होते. ठाकूरनगर पहाडी जवळील वळणाजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली व सागवानाच्या झाडावर आदळली. या धडकेत साहेब चक्रवर्ती व सौरभ चक्रवर्ती ही भावंडे जागीच मृत्युमुखी पडली. उपचारादरम्यान विशाल बच्छाड याचा मृत्यू झाला. मृतदेह चामोर्शी ग्रामीण रुग्णालय उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.
दुचाकी जळून खाक
धडक एवढी जोराची होती की अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. यात जळून खाक झाली. घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक नीतेश गोहणे हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.