अहेरीत गरजू महिलांना साडी वाटप
By Admin | Updated: September 26, 2015 01:17 IST2015-09-26T01:17:09+5:302015-09-26T01:17:09+5:30
धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य राजमाता राणी रूक्मिणीदेवी ....

अहेरीत गरजू महिलांना साडी वाटप
१० जणांचे रक्तदान : विमा योजनेसाठी पाच हजार अर्ज स्वीकारले
अहेरी : धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य राजमाता राणी रूक्मिणीदेवी यांच्या उपस्थितीत राजमहालाच्या विस्तीर्ण पटांगणावर शुक्रवारी अहेरी येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी गरजू गरीब महिलांना साडी वाटप राणी रूक्मिणीदेवी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, नाविसचे युवानेते कुमार अवधेशरावबाबा, प्रविणरावबाबा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राजमाता रूक्मिणीदेवी यांच्या हस्ते पंतप्रधान सुरक्षा बंधन विमा योजनेचे उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी मोटार सायकल परवाना, लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात १० रक्तदात्यांनी रक्तदान केले. विमा सुरक्षा योजनेंतर्गत पाच हजार नागरिकांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले. या कार्यक्रमाला अहेरी उपविभागातील पाच तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी राणी रूक्मिणीदेवी यांनी आपले दोन्ही सुपूत्र जनसेवेसाठी आपण अर्पण केले आहे व आपल्या प्रत्येकाचे दु:ख दूर करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन केले. राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या आईने आपल्याला सत्य व जनसेवेचा मार्ग दाखविला. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव तत्परतेने काम करू, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन कृष्णा मंचार्लावार तर आभार प्रकाश गुडेल्लीवार यांनी मानले. (प्रतिनिधी)