सालमारातील रोहयो मजुरांचे हात रिकामेच
By Admin | Updated: August 11, 2014 23:56 IST2014-08-11T23:56:08+5:302014-08-11T23:56:08+5:30
ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा अंतर्गत येणाऱ्या सालमारा येथील मजुरांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत भात खाचरचे काम फेब्रुवारी-मार्च महिन्यात केले होते.

सालमारातील रोहयो मजुरांचे हात रिकामेच
जोगीसाखरा : ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा अंतर्गत येणाऱ्या सालमारा येथील मजुरांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत भात खाचरचे काम फेब्रुवारी-मार्च महिन्यात केले होते. परंतु या कामाचा मोबदला मजुरांना अजूनपर्यंत देण्यात आला नाही. उन्हाळ्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सालमारा येथे अल्प कामे करण्यात आली. मात्र त्यांनतर मजुरांना कोणताही रोजगार मिळाला नाही. परिणामी सालमारातील मजुरांचे हात पैशाशिवाय रिकामेच आहे.
सालमारातील ४० मजुरांनी माहे फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये ढेकलू इष्टाम, तुळशिराम दोडके, मोहन घरत यांच्या शेतात भात खाचरचे मातीकाम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सहा हफ्ते केले. त्यापैकी केवळ दोन हफ्त्यांची मजुरी मजुरांना देण्यात आली. मात्र चार हफ्त्याची मजुरी पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप देण्यात आली नाही. पंचायत समिती आरमोरीकडून मजुरांची मजुरी देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे, असा आरोप मजुरांनी केला आहे. मजुरी का मिळाली नाही, याबाबत चौकशी केली असता, पंचायत समितीमधील संगणक संच बंद असल्यामुळे मजुरांच्या पगारासाठी विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. १ एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार मजुरांना १५ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास मजुरी देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्याच्या वेतनातून दर दिवस प्रतीमजूर ०.५० टक्के मजुरी कपात करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तरीही मजुरांना मजुरीपासून वंचित ठेवले जात आहे.
सालमारा येथील रोहयो मजुरांनी मजुरी मिळावी म्हणून वारंवार पंचायत समिती कार्यालयात विचारणा व चौकशी केली. मात्र त्यांच्या मागणीला पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी कुठलीही दाद दिली नाही. यंदा शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या सुरूवातीस दुबार पेरणी संकटाला सामोरे जावे लागले. शेती हंगामासाठी पैशाची आवश्यकता असून त्वरित मजुरी द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सालमारातील मजुरांनी दिला आहे. (वार्ताहर)