पामुलगौतम नदीत तीन महिलांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 15:05 IST2018-07-01T15:01:44+5:302018-07-01T15:05:05+5:30
नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला व एका मुलीचा पामुलगौतम नदीत बुडून मृत्यू झाला.

पामुलगौतम नदीत तीन महिलांचा बुडून मृत्यू
भामरागड (गडचिरोली) : नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला व एका मुलीचा पामुलगौतम नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मात्र आज सकाळी याबाबतची तक्रार झाल्यानंतर शोधकार्य सुरू झाले. दुपारी तिघींचेही मृतदेह काही अंतरावर सापडले. या घटनेत एक मुलगी सुदैवाने बचावली.
प्राप्त माहितीनुसार, भामरागडपासून १० किलोमीटरवर असलेल्या हिदूर या गावातील सोमी पोरिया दुर्वा (६० वर्ष), जनकी बिरजू तिमा (२७), चंदा रामजी गोटा (१५) या तीन मृत महिलांसह अनिषा तागडे (१०) ही बालिका शनिवारी दुपारी कपडे धुण्यासाठी पामुलगौतम नदीवर गेल्या होत्या. अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे त्यांना नदीतून काठावर येणे शक्य झाले नाही. आरडाओरड सुरू झाल्यानंतर या गडबडीत अनिषा ही बालिका कशीबशी काठावर येऊ शकली. तिने गावात येऊन घटनेची माहिती गावकऱ्यांना सांगितले. गावातील लोकांनी सायंकाळपर्यंत शोधाशोध केली, पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही.
रविवारी सकाळी भामरागड पोलीस ठाणे आणि तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांनी घटनास्थळी पोहोचून शोधकार्यासाठी मार्गदर्शन केले. दुपारी १२ च्या सुमारास तिघींचेही मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर सापडले.
या घटनेतील मृत चंदा आणि बचावलेली अनिषा या मुली भामरागड येथील राजे धर्मराव हायस्कूलमध्ये शिकत होत्या. याप्रकरणी भामरागड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.