रेगडी कालव्याची दुर्दशा

By Admin | Updated: August 19, 2014 23:43 IST2014-08-19T23:43:57+5:302014-08-19T23:43:57+5:30

चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची

Rigid Canal Plight | रेगडी कालव्याची दुर्दशा

रेगडी कालव्याची दुर्दशा

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
रेगडी येथील कन्नमवार जलाशय हा गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. या तलावाच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला पाण्याचा पुरवठा केला जातो. जिल्हा निर्मिती होण्यापूर्वीच सदर तलाव बांधण्यात आला. सदर तलाव दिनानदीवर बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावाला दिना प्रकल्प असेही संबोधण्यात येते. दिना नदी जंगलातून येत असल्याने या नदीच्या पाण्याच्या सहाय्याने सदर तलाव तत्काळ भरतो.
तलावाजवळून पाण्याचा वेग जास्त राहत असल्याने कालवा क्षतिग्रस्त होण्याचे प्रमाण सर्वात जास्त राहते. त्यामुळे तलावाची निर्मिती झाल्यानंतर कालव्याच्या आतील बाजूने दगडाची पिचिंग करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात सदर पिचिंग कोसळली आहे. त्यामुळे कालव्याच्या बाजूची माती विरघडून दरड कोसळल्या आहेत. अगदी तलावाच्या जवळ पाण्याचा वेग अधिक राहत असल्याने दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालेले आहे. परिणामी कालव्याला मोठ- मोठे भगदाड पडले आहेत. या भगदाडांमुळे पाण्याचा अपव्ययही होत आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे याकडे मागील अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. हीच स्थिती उपकालव्यांचीही झाली आहे. दरवर्षी कालवे फुटण्यांमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. वेळेवरच कालवा दुरूस्त करावा लागल्यामुळे अधिकची रक्कमही पाटबंधारे विभागाला मोजावी लागते. तेवढे दिवस शेताला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. कालवा फुटल्यानंतर शेतातील पिकांचेही नुकसान होते. याबाबी दरवर्षीच घडतात. यापासून पाटबंधारे विभागामात्र कोणतेही शहाणपण शिकण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या शेतीला या तलावाच्या पाण्याच्या सहाय्याने सिंचन केले जाते. अशा शेतकऱ्यांकडून एकरी पाणसारा वसूल केला जातो. पाणसाऱ्याच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रूपयांचा महसूल पाटबंधारे विभागाकडे गोळा होतो. यातून कालव्याची डागडूजी करणे सहज शक्य आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरीही चिंंतेत पडले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन कालवा दुरूस्तीची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Rigid Canal Plight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.