बाजारभावानुसार मोबदला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:25 PM2017-12-04T23:25:20+5:302017-12-04T23:26:30+5:30

वडसा (देसाईगंज)-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाने आता वेग घेतला असून या रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे.

Revenue by Market Value | बाजारभावानुसार मोबदला हवा

बाजारभावानुसार मोबदला हवा

Next
ठळक मुद्देशेतकरी व भूखंडधारकांची मागणी : सात गावांच्या १७५ सर्वे क्रमांकातील खासगी जमीन लागणार

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : वडसा (देसाईगंज)-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाने आता वेग घेतला असून या रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. त्याअंतर्गत वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यासाठी गडचिरोलीच्या उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित शेतकरी व भूखंडधारकांना सोमवारी कार्यालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान आमच्या शेतजमिनी तसेच भूखंडाचा चालू बाजारभावानुसार योग्य मोबदला शासनाकडून देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी शेतकरी व भूखंडधारकांनी यावेळी केली. सदर रेल्वे प्रकल्पासाठी मार्ग व रेल्वेस्थानक मिळून सात गावातील एकूण १७५ सर्वे नंबरवरील खासगी जमीन लागणार आहे.
वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्ग व गडचिरोली येथील रेल्वेस्थानक निर्मितीसाठी कोणत्या ठिकाणची किती जमीन लागणार याबाबत निश्चिती करण्यासाठी भूमीअभिलेख विभागाने आॅगस्ट महिन्यात जमिनीची मोजणी केली होती. त्यानंतर रेल्वे विभागाने सदर रेल्वेमार्ग व रेल्वेस्थानकाचा नकाशा तयार करून तो प्रशासनाकडे पाठविला आहे. सदर रेल्वे प्रकल्पासाठी खासगी जमीन लागणार असल्याने गडचिरोली, लांझेडा, महादवाडी आदीसह सात गावातील जवळपास १०० भूखंडधारक व शेतकऱ्यांना वाटाघाटीसाठी गडचिरोलीच्या उपविभागीय कार्यालयात सोमवारी बोलाविण्यात आले होते.
याप्रसंगी गडचिरोलीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, गडचिरोलीचे तहसीलदार डी. एस. भोयर, नायब तहसीलदार एम. एन. शेंडे, अव्वल कारकून एस. एम. दिवसे, वनिशाम येरमे आदी उपस्थित होते.
भूमी संपादनासाठी सर्वप्रथम गडचिरोली, त्यानंतर लांझेडा व त्यानंतर महादवाडी येथील भूमीधारक व प्लाटधारकांना बोलविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी संबंधित भूमीधारकांना नकाशा दाखवून त्यांना आपली शेतजमीन नेमक्या कुठल्या सर्वेनंबरमध्ये समाविष्ट आहे, याची माहिती जाणून घेतली. तसेच गडचिरोली बस आगाराच्या मागील परिसरातील भूखंडधारक व घर मालकांना आपले भूखंड कोणत्या सर्वे नंबरमध्ये व किती क्षेत्रात समाविष्ट आहे, याची माहिती जाणून घेतली.
सदर वाटाघाटीदरम्यान गडचिरोली शहरात रेल्वे आल्यास विकासाला चालना मिळेल. त्यामुळे गडचिरोली शहरात येणाºया रेल्वेचे आम्ही स्वागतच करतो. मात्र सदर रेल्वेमार्ग व रेल्वेस्थानकासाठी संपादीत करण्यात येणाºया आमच्या खासगी जमिनीला चालू बाजारभावानुसार मोबदला तसेच किंमत मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी उपविभागीय अधिकारी सदगीर यांच्याकडे केली. यावर उपविभागीय अधिकारी सदगीर यांनी शेतकरी व भूखंडधारकांच्या भावना व मागणी जिल्हा प्रशासनाकडे आपण मांडणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. सदर वाटाघाटीदरम्यान अनेक शेतकºयांनी प्रत्यक्ष नकाशा पाहून आपली जमीन व क्षेत्रफळ नेमके किती व कुठे आहे, याची माहिती एसडीओंना दिली.
४०.४८ हेक्टर खासगी जमीन संपादित होणार
गडचिरोली-वडसा रेल्वे मार्गासाठी व रेल्वेस्थानकासाठी गडचिरोली, लांझेडा, अडपल्ली, गोगाव आदीसह सात गावातील एकूण १७५ सर्वेमधील ४०.४८ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात येणार आहे. याशिवाय सदर रेल्वेमार्गाला वन विभागाची ४० हेक्टर तर १० हेक्टर शासकीय जमीन लागणार आहे.
खासगी जमिनीचे दर ठरले नाही
रेल्वेमार्गासाठी खासगी जमीन लागणार असून ती संपादीत करण्यासाठीची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे. मात्र खासगी जमिनीचे तसेच रिकामे भूखंड आणि बांधण्यात आलेल्या पक्के घरांचे दर शासन, प्रशासनाकडून अद्यापही निश्चित करण्यात आले नाही. मात्र वाटाघाटीदरम्यान उपविभागीय अधिकारी सदगीर यांनी ज्या शेतकºयांची तसेच भूखंडधारकांची जमीन लागणार आहे. त्यांना बाजारभावानुसार योग्य तो मोबदला मिळणार असल्याचे शेतकºयांना सांगितले.
काय म्हणतात, प्लाटधारक?
रेल्वे प्रकल्पासाठी सर्वे नंबर ३५/३ मधील खासगी भूखंडाची जमीन संपादीत करण्यात येणार आहे. शासनाकडून आम्हाला बाजारभावानुसार मोबदला देण्यात यावा, अथवा आम्ही घेतलेल्या किंमतीत तेवढ्याच क्षेत्रफळाचा दुसरा प्लाट सेमाना, माडेतुकूम परिसरात देण्यात यावा, अशी मागणी उपविभागीय अधिकाºयांकडे भूखंडधारक विजय मेश्राम, अरूणा तेलसे, देवराव चौधरी, अर्चना पोटवार, प्रमोद शेंडे, सूर्यवंशी गव्हारे, बुरीवार, चन्नावार, चौधरी, सहारे, कोहपरे, धात्रक, ढगे आदी भूखंडधारकांनी केली.
लांझेडा परिसरातील ४० ते ५० भूखंडधारकांनी उपविभागीय अधिकाºयांशी खासगी जमीन संपादीत करण्याबाबत चर्चा केली. चालू बाजारभावाच्या सहापट दराने आमच्या भूखंडाचा मोबदला मिळावा, अथवा आमच्या भूखंडाच्या बदल्यात दुसरा भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सूर्यवंशी सहारे, आकनूरवार आदींनी केली आहे.
शेतकरी व भूखंडधारकांना नोटीस नाही
रेल्वे प्रकल्पासाठी खासगी जमीन संपादीत करण्यात येणाºया शेतकºयांची प्रशासनातर्फे वाटाघाटी करण्यात आल्या. मात्र ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येणार आहे. अशा शेतकºयांना उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजाविण्यात आली नाही, अशी माहिती येथे उपस्थित झालेल्या काही शेतकºयांनी दिली.

याबाबत उपविभागीय अधिकारी सदगीर यांच्याकडे विचारणा केली असता, ज्या शेतकºयांची शेतजमीन संपादीत करण्यात येणार आहे. त्यांना त्या-त्या सर्कलच्या तलाठ्यांकडून माहिती देण्यात आली. त्यामुळे शेतकरी याबाबत अनभिज्ञ नाही, असे सदगीर यांनी सांगितले.

यापूर्वी तत्कालीन एसडीओंनी २८ नोव्हेंबर रोजी वाटाघाटीबाबत बैठक घेतली होती. मात्र याबाबत जाहीर प्रसिध्दी करण्यात आली नव्हती.

रेल्वेमार्ग, रेल्वेस्थानकासाठी संपादित करण्यात येणाºया खासगी जमिनीबाबत वाटाघाटी करण्यासाठी शेतकरी व भूखंडधारकांना सोमवारी उपविभागीय कार्यालयात बोलाविण्यात आले. लांझेडा, महादवाडी, गडचिरोली येथील जवळपास १०० लोकांनी हजेरी लावली. हे सारे लोक सदर रेल्वे प्रकल्पासाठी आपली खासगी जमीन देण्यास तयार असल्याचे वाटाघाटीतून दिसून आले. मात्र बाजारभावानुसार योग्य मोबदला मिळण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सदर बाब आपण जिल्हा प्रशासनाकडे मांडणार असून शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाईल. सदर प्रकल्पामुळे प्रदुषण व इतर कोणतेही नुकसान तसेच समस्या उद्भवणार नसल्याने खासगी जमीन संपादीत करण्याबाबत आपण शेतकºयांची जाहीर सुनावणी घेतली नाही.भूमीधारकांच्या सहकार्याने वाटाघाटीतूनच सदर रेल्वेमार्गासाठी खासगी जमीन संपादीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- नितीन सदगीर, प्रभारी उपविभागीय अधिकारी, गडचिरोली

Web Title: Revenue by Market Value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.