शहरातील नाल्यांची दुरूस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:31+5:302021-05-01T04:34:31+5:30
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय ...

शहरातील नाल्यांची दुरूस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच अच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाले आहेत, भिंती पिचकारीने रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण काढा
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी, ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्करासाठी अनेक अडचणी येतात.
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष हाेत आहे.
मूल मार्गावरील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : इंदिरा गांधी चाैकापासून मुख्य मार्गाच्या बाजूला काही नागरिकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमणासाठी बाजूची नाली बुजविली जात आहे. एका बाजूने राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. महिला व वयाेवृद्ध वाहनचालकांना वाहन वळविताना त्रास हाेत आहे.
चामोर्शी-मूल मार्गावरील झुडपे तोडा
चामोर्शी : भेंडाळा-चामोर्शी-मूल मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडपांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या मार्गावरील झुडपे तोडावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अंगणवाड्यांचे बांधकाम अपूर्ण
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षाच्यावतीने तीन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून एकूण ४३५ अंगणवाडी केंद्रांचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी ३४२ वर कामे पूर्ण झाले असून, अनेक अंगणवाड्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहेत.
कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची मागणी
चामोर्शी : नगर पंचायतीच्या निर्मितीनंतर चामोर्शी येथील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रभागवार जमा केलेला कचरा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या व मोठ्या नहराच्या पाळीजवळ तसेच परिसरात टाकला जात आहे. त्यामुळे सर्वत्र घाण दिसून येते.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपनींच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
ओपनस्पेसमुळे डासांचा प्रादुर्भाव
गडचिरोली : न. प. प्रशासनाच्यावतीने लाखो रुपये खर्च करून वॉर्डा-वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने त्यामध्ये कचरा टाकला जात आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणहोत आहे. परिणामी, जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.