अनेकांकडून टॉकिजच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:01:14+5:30

सिरोंचा येथील तत्कालीन ग्राम पंचायतीच्या काळात टूरिंग टॉकिज होती. त्यामागे तट्यांची टॉकिज होती. अहेरी येथील दामोधर बेझलवार हे सदर टॉकिज चालवत होते. सिरोंचा तालुक्यातील नागरिक विशेषत: तेलगू भाषिक असल्याने त्या काळात अधिकाधिक तेलगू भाषिक चित्रपट प्रदर्शित व्हायचे. काही वर्षानंतर हिंदी चित्रपटसुद्धा दाखविले जायचे.

Rekindle memories of talkies from many | अनेकांकडून टॉकिजच्या आठवणींना उजाळा

अनेकांकडून टॉकिजच्या आठवणींना उजाळा

ठळक मुद्देचित्रपट पाहण्यासाठी उसळत असे गर्दी : ४८ वर्षांपूर्वीची मौज; उरल्या केवळ आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : परिवारासह चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याची मौज वेगळीच असते. एकाच सिनेमा हॉलमध्ये दोन किंवा चार सिनेमागृह असायचे. पसंतीनुसार प्रत्येकजण कोणताही एक चित्रपट पाहायचा. सिरोंचातही १९७२-७३ मध्ये सिनेमा टॉकिज होते. येथे खासकरून तेलगू चित्रपट दाखविले जायचे. हे चित्रपट बघण्यासाठी दूरवरून लोक येथे गर्दी करीत असत. मात्र आता येथे टॉकिजचा लवलेशही दिसून येत नाही. ४८ वर्षांपूर्वीच्या केवळ आठवणी उरल्या आहेत.
सिरोंचा येथील तत्कालीन ग्राम पंचायतीच्या काळात टूरिंग टॉकिज होती. त्यामागे तट्यांची टॉकिज होती. अहेरी येथील दामोधर बेझलवार हे सदर टॉकिज चालवत होते. सिरोंचा तालुक्यातील नागरिक विशेषत: तेलगू भाषिक असल्याने त्या काळात अधिकाधिक तेलगू भाषिक चित्रपट प्रदर्शित व्हायचे. काही वर्षानंतर हिंदी चित्रपटसुद्धा दाखविले जायचे. तेलगू चित्रपटातील एन. टी. रामावार, अवकीनी नागेश्वरराव, शोभनबाबू, कांताराव, जगय्या, कृष्णा, मुरली मोहन आदी पुरूष अभिनेत्यांसह अंजलीदेवी, जमुना, सावित्री, लक्ष्मी, वणिक्षी, कांचना शारदा आदी स्त्री कलावंत प्रसिद्ध होते.
सिरोंचा येथे धार्मिक, ऐतिहासिक चित्रपट दाखविले जायचे. यामध्ये अनेक चित्रपटांचा समावेश होता. काही वर्षांनी सदर टॉकिज बंद पडल्या व व्हिडीओ पार्लर सुरू झाले. परंतु हा व्यवसाय फार काळ टिकू शकला नाही. बदलत्या तंत्रज्ञानानुसार दूरचित्रवाणीची क्रांती झाली. टीव्हीवर जुने, नवीन चित्रपट दाखविण्यास सुरूवात झाल्याने लोकांमध्येही टॉकिजविषयी अनास्था वाढली. सिरोंचा येथील टॉकिजसुद्धा कायमची बंद पडली.
टॉकिजच्या जागेवर काटेरी झुडपे वाढली आहेत. सध्या ही जागा मोकळीच असल्याने गावातील जुने जाणकार नवीन पिढीला येथील टॉकिजबाबत आठवणी सांगतात. त्यामुळे जुन्या काळातील अनेकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळतो.

बैलबंडीने गाठायचे टॉकिज
मनोरंजनासाठी कुठलेही साधन नसल्याने चार ते पाच दिवस एक चित्रपट सहज दाखविला जायचा. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत असे. काही वर्षानंतर टॉकिज बंद झाली. चित्रपट पाहण्यासाठी नागरिक बऱ्याच अंतरावर सिरोंचा येथे दाखल होत असत. अनेकजण पायी तसेच बैलबंडीने अंतर कापून सिनेमागृह गाठायचे.

Web Title: Rekindle memories of talkies from many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.