जन्म-मृत्यूसाठी २१ दिवसांत करा नोंदणी; आता करू शकता ऑनलाईन नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:15 IST2024-11-08T16:14:20+5:302024-11-08T16:15:39+5:30
प्रशासनाकडूनही जनजागृती : स्वतंत्र वेबसाइट केली तयार

Register for births and deaths within 21 days; Can now register online
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सध्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची विविध कामांसाठी गरज भासते. त्यामुळे जन्मानंतर किंवा मृत्यूनंतर २१ दिवसांत ऑनलाइन नोंदणी करून प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत नोंदणी नाही केली तर पुन्हा या प्रमाणपत्रांसाठी धावपळ करावी लागणार आहे.
एखाद्या बालकाचा जन्म किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू असो, त्याबाबतचे प्रमाणपत्र जवळील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करून घ्यावे लागते. अनेक जण हे प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, ऐनवेळी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांची धडपड सुरू होते. त्यावेळी मात्र प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासही सहन करावा लागतो. ही गोष्ट टाळण्यासाठी आता शासनाने जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी पोर्टल तयार केले आहे. त्या पोर्टलवर घरबसल्याही ऑनलाइन नोंदणी करता येते. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयातही तो अर्ज सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रमाणपत्र निर्गमित केले जाते.
ऑफलाइन अर्जही करा
शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. त्यानंतर संबंधिताने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करणेही अधिक गरजेचे आहे. जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी २१ दिवसांत अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्ज केला तर संबंधित बीडीओ यांची परवानगी घेऊन प्रमाणपत्र मिळवावे लागते.
"२१ दिवसांच्या आतच जन्म व मृत्यूची नोंद ग्राम पंचायतीत करता येते. यापेक्षा जास्त दिवस झाल्यास बीडीओंची परवानगी असलेले पत्र आणावे लागते. त्यामुळे वेळेवर नोंद केलेली बरी."
- डी. डी. मेश्राम, निबंधक तथा ग्राम पंचायत अधिकारी