बीडीएसवर एक कोटीचा निधी प्राप्त
By Admin | Updated: August 24, 2014 23:29 IST2014-08-24T23:29:21+5:302014-08-24T23:29:21+5:30
जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रस्ते, नाली, मोरी बांधकाम व अन्य विकास कामे घेतली जातात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या वर्षी ३०५४ निधीतून जिल्ह्यात

बीडीएसवर एक कोटीचा निधी प्राप्त
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रस्ते, नाली, मोरी बांधकाम व अन्य विकास कामे घेतली जातात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या वर्षी ३०५४ निधीतून जिल्ह्यात २७ विकास कामांना मंजुरी देऊन निविदा काढली आहे. मात्र प्रत्यक्षात बीडीएसवर ३०५४ चा केवळ १ कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मंजूर केलेले २७ कामे कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यात अनेक विकासकामे घेतली जातात. जिल्हा वार्षिक योजनेच्या आदिवासी उपयोजना जिल्हा रस्ते, आदिवासी उपयोजना किमान गरजा कार्यक्रम तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण कार्यक्रमातून रस्ते, पूल, नाली आदींचे नवे कामे तसेच दुरूस्तीची कामे मंजूर केली जातात. गडचिरोली जिल्हा परिषदेकडे ३०५४ चा बिडीएसवर केवळ १ कोटी रूपयाचा निधी शिल्लक आहे. गतवर्षी ३०५४ च्या निधीतून पूर्ण केलेल्या कामांचे १३ कोटी रूपये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला देणे बाकी आहे. जिल्हा परिषदेकडे सध्या ३०५४ अंतर्गत २० कोटींचा निधी मंजूर आहे. जुने १३ कोटी रूपये वजा जाता ७ कोटी रूपये शिल्लक राहतात. दीडपट कामांच्या पद्धतीनुसार यंदा जि. प. च्या बांधकाम विभागाने ३०५४ निधीतून १० कोटींची कामे मंजूर करणे गरजेचे होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जि. प. च्या बांधकाम विभागाने २७ कोटींच्या कामांना मंजुरी देऊन निविदा काढली आहे. या कामांना जि. प. च्या वित्त व लेखाधिकाऱ्यांनी कशी काय मान्यता दिली, सदर कामे कुणाच्या दबावात मंजूर करण्यात आली आहे काय, असे नाना विविध प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाच्या वर्तुळात निर्माण होत आहे. २० सप्टेंबर रोजी जि. प. पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सदर विकास कामांचे श्रेय आपल्याला मिळावे, या हेतूने निधी नसतांनाही कामांना मंजुरी दिली असावी, अशी चर्चा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)