वैरागडात आढळले दुर्मिळ चांदणी कासव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST2021-05-12T04:38:21+5:302021-05-12T04:38:21+5:30
वैरागड (गडचिरोली) : अतिशय दुर्मिळ समजल्या जाणारे ‘चांदणी कासव’ गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड परिसरात सोमवारी (दि. १०) आढळून आले. जिल्ह्यात ...

वैरागडात आढळले दुर्मिळ चांदणी कासव
वैरागड (गडचिरोली) : अतिशय दुर्मिळ समजल्या जाणारे ‘चांदणी कासव’ गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड परिसरात सोमवारी (दि. १०) आढळून आले. जिल्ह्यात या प्रकारातील कासव आढळल्याची पहिलीच नोंद वनविभागाने घेतली आहे.
वैरागड येथील नलिना थलेश्वर मेश्राम ही महिला जंगलात तेंदूपाने संकलनासाठी जात असताना वैरागड ते वडेगाव मार्गावर हे दुर्मिळ प्रजातीचे कासव दिसले. उत्सुकतेपोटी त्यांनी ते कासव आपल्या घरी आणून एका बादलीत पाणी भरून त्यात सोडले. त्यानंतर याबाबतची माहिती आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार व वनरक्षक कृष्णकला खोब्रागडे यांना देण्यात आली.
चांदणी कासवाला इंग्रजीत ‘इंडियन स्टार टॉरटाइज’ म्हणतात. या कासवाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, गडचांदूर परिसरात काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तो भाग या कासवांसाठी उत्तम अधिवास असल्याचे प्राणिमित्र सांगतात. त्यामुळे मुंबईतील तस्करांकडून पकडलेले काही कासव त्या परिसरात सोडण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात हे कासव आढळल्यामुळे या भागातही त्यांचा अधिवास असण्याची शक्यता असून वैरागड परिसरात वनविभागाकडून या प्रजातीचे संशोधन करण्याची गरज प्राणिमित्र व्यक्त करत आहेत.
(बॉक्स)
कासव आले कुठून?
वैरागड-वडेगाव हा मार्ग जंगलाने व्यापलेला आहे. वैरागडजवळून वैलोचना नदी आणि थोड्या अंतरावर खोब्रागडी नदी वाहते. या दोन्ही नद्यांच्या दरम्यान खोलदान म्हणून पाऊलवाट आहे. त्या ठिकाणी हे दुर्मिळ कासव आढळून आले. हे कासव नेमके कुठून आले, हा प्रश्न मात्र सध्यातरी अनुत्तरित आहे.