दारूविक्री विरोधात रणरागिनींचा एल्गार
By Admin | Updated: August 17, 2014 23:09 IST2014-08-17T23:09:57+5:302014-08-17T23:09:57+5:30
कायद्याने दारूबंदी असतानाही कोरची तालुक्यात अनेक गावात अवैध देशी व मोहफुलाच्या दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. या संदर्भात पोलीस व तंटामुक्त समितीकडे तक्रार करूनही कुठलीही कारवाई

दारूविक्री विरोधात रणरागिनींचा एल्गार
कोरची : कायद्याने दारूबंदी असतानाही कोरची तालुक्यात अनेक गावात अवैध देशी व मोहफुलाच्या दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. या संदर्भात पोलीस व तंटामुक्त समितीकडे तक्रार करूनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या कोचीनारा येथील ६ बचतगटांच्या महिलांनी एकत्र येऊन आज रविवारी दारूविक्रेत्यांविरोधात एल्गार पुकारून तब्बल दीड लाख रूपयाची देशी दारू जप्त केली. तसेच ७ हजार रूपयाचा मोहफुलाच्या दारूचा सडवा जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केला.
अवैध दारू विक्रीचा कोचीनारा येथील महिलांना प्रचंड त्रास होत होता. दरम्यान दारूविक्रीमुळे गावात भांडणतंटे होऊन सामाजिक वातावरण खराब होत होते. या संदर्भात बचतगटाच्या महिलांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर सरपंच तिलक बागडेरीया महिला बचतगटाचे अध्यक्ष भगवंतीन साहाळा यांच्या नेतृत्वात महिला एकत्र त्यांनी रघुनाथ सहारे यांच्या घरकुलामधून देशी दारूच्या ४५ पेट्या जप्त केल्या. तसेच मोहफुलाच्या दारूचा २ क्विंटल सडवाही जप्त केला. याबाबतची माहिती पोलिसांना देऊन गावात पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ट्रॅक्टर व पीकअप वाहनामध्ये भरून दारूच्या पेट्या व सडवा पोलीस ठाण्यात नेले. यावेळी सरपंच तिलक बागडेरीया, बचत गटाच्या सदस्य कामेश्वरी देवागंण, शारदा काटेंगे, महानंदा कराडे, माना सुवा, देशीरबाई सोनकुकरी, पवनभत्ती साहाळ, ललिता देवांगण, सुशिला देवांगण, प्रिती सुवा, हेमा खोबा, अमरित बागडेरिया, किरण देवांगण, समारीन सुवा, शैरा बानो पठाण, शिवबत्ती देवांगण, रमीका सोनकुकरा, पे्रमबत्ती सोनकुकरा आदीसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)