मेंढावासी गटशेतीसाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:53 PM2018-12-06T23:53:57+5:302018-12-06T23:55:06+5:30

जिल्ह्यात ‘ग्रामस्वराज्या’ची संकल्पना पहिल्यांदा अंमलात आणणाऱ्या धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावात आता सेंद्रिय पद्धतीने गटशेती करण्याचा संकल्प गावकºयांनी ग्रामसभेच्या बैठकीत केला.

The rams have lined up for the grassroots | मेंढावासी गटशेतीसाठी सरसावले

मेंढावासी गटशेतीसाठी सरसावले

Next
ठळक मुद्देग्रामसभेत संकल्प : कृषी विभागाकडून मिळणार १ कोटींचे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात ‘ग्रामस्वराज्या’ची संकल्पना पहिल्यांदा अंमलात आणणाऱ्या धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावात आता सेंद्रिय पद्धतीने गटशेती करण्याचा संकल्प गावकºयांनी ग्रामसभेच्या बैठकीत केला. ग्रामसभेचे ज्येष्ठ मार्गदर्शक देवाजी तोफा यांच्या पुढाकारातून पुन्हा एकदा हे गाव नवीन इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाले आहे.
शासनाच्या योजनेनुसार गटशेतीसाठी ६० टक्के अनुदान दिले जाते. त्यासाठी १ कोटी रुपयापर्यंत अनुदानाची मर्यादा आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०१७-१८) जिल्ह्यातून गटशेतीसाठी ६ प्रस्ताव गेले होते. परंतू सर्व प्रस्तावांमध्ये कृषी आयुक्त कार्यालयाने त्रुटी काढल्या. त्यांची पूर्तता अद्याप कोणत्याही गटाने गेलेली नाही. मात्र मेंढा गावाने त्रुटी दूर करण्यासह सुधारित कृती आराखडा सादर करण्याचा निश्चय बुधवारी (दि.५) घेतलेल्या ग्रामसभेच्या बैठकीत केला. देवाजी तोफा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुका कृषी अधिकारी एन.जी.बडवाईक, ग्रामसभेचे अस्थायी अध्यक्ष मनिराम दुगा, गावपुजारी शिवदास तोफा, प्रा.डॉ.कुंदन दुफारे, कृषी सहायक जे.एस.भाकरे उपस्थित होते. त्यांनी सामूहिक गटशेतीचे काय फायदे आहेत, याविषयी माहिती दिली. १०० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या मेंढा गावात ३०० एकर शेती असून, १०५ कुटुंब आहेत. १०० एकराचा एक गट याप्रमाणे तीन गट तयार करण्यात आले आहेत. उत्पादनातून खर्च वजा जाता १० टक्के हिस्सा ग्रामसभेकडे जमा होईल व उर्वरित रक्कम व्यक्तीगत कामानुसार प्रत्येक गावकºयाला मिळेल. या गटशेतीच्या माध्यमातून कृषी प्रशिक्षण, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, कृषिमाल प्रक्रिया व विपणन, शेतीपूरक व्यवसाय, पशुधन, गांडूळ व कंपोस्ट खत निर्मिती, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस, कांदाचाळ इत्यादी बाबीही पुढे गावात दृष्टिपथास येणार आहेत.

गेल्यावर्षीचे सहा मंजूर प्रस्ताव त्रुटीमुळे प्रलंबित
गटशेती योजनेअंतर्गत वर्ष २०१७-१८ मध्ये मिळालेल्या उद्दीष्टानुसार गटशेतीसाठी वेगवेगळ्या गावातील ६ प्रस्तावांना जिल्हास्तरिय समितीने मंजुरी दिली आहे. परंतू कृषी आयुक्त कार्यालयाने त्यात काढलेल्या त्रुटींची पूर्तता प्रस्ताव सादर करणाºया कोणत्याही गटांनी केलेली नाही. त्यामुळे हे गट शासकीय अनुदानापासून वंचित आहेत.

१ कोटी ७० लाखांचा खर्च
मेंढा गावाने सेंद्रीय शेतीसह गांढूळ खत, तुषार सिंचन, एक ट्रॅक्टर, एक रोटोवेटर, धान कापणी यंत्र अशा विविध वस्तूंच्या खरेदीसह गटशेतीसाठी एकूण १ कोटी ७० लाख रुपये खर्च येणार असल्याचा सुधारित प्रकल्प आराखडा तयार केला आहे. येथील नागरिक अनेक वर्षांपासून सामूहिक सेंद्रीय शेती करतात. परंतु आता व्यापारी दृष्टिकोनातून बागायती शेती करायची आणि विषमुक्त उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आला.

शासनाच्या गटशेती योजनेअंतर्गत मेंढा ग्रामसभेने गेल्यावर्षीच गटशेती करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तो मंजूरही झाला आहे, पण प्रकल्प आराखड्यातील त्रुटींची पूर्तता झालेली नसल्यामुळे अनुदान मिळाले नव्हते. बुधवारी झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली असून त्रुटी केल्या जात आहेत.
- एन.जी.बडवाईक,
तालुका कृषी अधिकारी, धानोरा

Web Title: The rams have lined up for the grassroots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी