वडसा भूमिगत पुलाच्या बांधकामास रेल्वेची मंजुरी
By Admin | Updated: October 29, 2016 01:44 IST2016-10-29T01:44:03+5:302016-10-29T01:44:03+5:30
रेल्वे स्थानकावरील बहुप्रतिक्षीत भूमिगत पुलाच्या अप्रोच रस्त्याला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने मंजुरी प्रदान केली

वडसा भूमिगत पुलाच्या बांधकामास रेल्वेची मंजुरी
देसाईगंज : रेल्वे स्थानकावरील बहुप्रतिक्षीत भूमिगत पुलाच्या अप्रोच रस्त्याला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने मंजुरी प्रदान केली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
रेल्वे क्राँसिंगमुळे देसाईगंज शहर दोन भागात विभागल्या गेला आहे. एका भागात रहिवासी असून दुसऱ्या भागात बाजारपेठ आहे. परिणामी रहिवासी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिवसातून अनेकवेळा बाजार परिसरात ये-जा करावे लागते. ये-जा करताना रेल्वे रूळ ओलांडावेच लागते. या रेल्वे मार्गावरून दिवसातून अनेकवेळा रेल्वे गाड्या ये-जा करीत असल्याने १० ते १२ वेळा रेल्वे फाटक पडते. परिणामी नागरिकांना तासणतास ताटकळत राहावे लागते. रहिवाशांसाठी ही मोठी डोकेदुखी आहे. याबाबत वडसा रेल्वे सल्लागार समिती तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या खासदार अशोक नेते यांनी वारंवार पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली.
भूमिगत रेल्वे पुलाच्या अॅप्रोच रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्याबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून अतिक्रमण काढून तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
अतिक्रमण हटविणार
भूमिगत पुलाच्या अॅप्रोच रस्त्याच्या बांधकामाला रेल्वेने मंजुरी प्रदान केल्याने या मार्गावरील अतिक्रमण काढावे लागणार आहे. सदर पूल व रस्ता झाल्यास देसाईगंजवासीयांची वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.