५० हजार हेक्टरवर रबीची पेरणी
By Admin | Updated: October 7, 2014 23:33 IST2014-10-07T23:33:21+5:302014-10-07T23:33:21+5:30
चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही

५० हजार हेक्टरवर रबीची पेरणी
गडचिरोली : चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. खरीप पिकाचे १ लाख ४९ हजार २६० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापूर्वी शेतकरी खरीप हंगामातच पीक घेत होते. मात्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर, विंधन विहीर, पाणीपंप, डिझेल इंजिन व अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकरी वर्गास सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पिके घेण्याकडे कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात रबी हंगामाचे २३ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. कमी सिंचनात चांगले पीक येतील अशा वाणांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्याचबरोबर कोणत्या जमीनीमध्ये कोणते पिक घ्यावे, याबद्दही मार्गदर्शन केले जात असल्याने रबी हंगामाचे क्षेत्र दरवर्षी वाढत चालले असल्याचे दिसून येते. यावर्षी सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
यामध्ये गहू १ हजार ५४५ हेक्टर, ज्वारी ७ हजार हेक्टर, संकरीत मका ५ हजार ३१०, हरभरा ७ हजार ६६०, लाखोळी १७ हजार ६५०, मुंग १ हजार ८००, जवस ५ हजार ६५५, तीळ २ हजार ५७५, सूर्यफुल २४०, करडई ५०, भुईमूग ६०० व मोहरी पिकाची २०० हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. यासाठी ५ हजार ७१७ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. रब्बी बियाणांची पेरणी आॅक्टोबर महिन्यामध्ये केली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा जाणवणार नाही. याची पूर्ण खबरदारी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. एक महिन्यापूर्वीच दमदार पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग रबी पिकासाठी जमीन तयार करण्याच्या कामाला लागला आहे. लाखोळी, मूग, हरभरा व गहू या पिकांचे उत्पादन धानाच्या बांधीतच घेतले जाते. त्यामुळे या पिकांची पेरणी आॅक्टोबरच्या शेवटी केली जाणार आहे. कृषी विभागाने मात्र आधीच नियोजन केले आहे. (नगर प्रतिनिधी)