'पुष्पा' चित्रपटाची स्क्रिप्ट चोरली ! गडचिरोलीत वनरक्षकाच्या मदतीनेच सागवान लाकडांची तस्करी; वनविभागात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:18 IST2025-10-09T15:17:01+5:302025-10-09T15:18:59+5:30
तडकाफडकी निलंबन : सिरोंचा तालुक्यातील प्रकार

'Pushpa' movie script stolen! Teak wood smuggling with the help of forest guard in Gadchiroli; Forest department in a state of shock
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्यावर वनकर्मचाऱ्यांनी सागवान लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारी मालवाहू जीप पकडली होती. या प्रकरणातील आरोपीने वनरक्षकाच्या मदतीनेच तस्करी केली जात होती, अशी धक्कादायक कबुली दिली. त्यामळे वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याला ८ ऑक्टोबरला तकडाफडकी निलंबित करण्यात आले.
चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्यावर १ ऑक्टोबर रोजी मालवाहू जीपमधून (एमएच ३४ एबी-५४८४) नेले जाणारे ५१ हजार रुपये किमतीचे ०.४३५ घनमीटर लाकडाचे पाच नग जप्त केले होते. यावेळी आरोपी संदीप दामोधर मडावी (३४,रा. कन्हाळगाव, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) यास ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता ३ ऑक्टोबरपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. चौकशीनंतर आरोपीकडून तस्करीसाठी वापरलेले ट्रॅक्टर, दुचाकी, दोन चेनसों मशीन आणि लोखंडी साखळी जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपीने वनविकास महामंडळाचे वनरक्षक जितेंद्र धर्मराव मडावी यांचा सहभाग असल्याचे सांगितले. यानंतर वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जितेंद्र मडावी यास तत्काळ निलंबित केले. वनविकास महामंडळाच्या कोप्पेला नियतक्षेत्रातील खंड क्रमांक २३३ मधून सागवान लाकूड तोडल्याचे आरोपीने कबूल केले.
आणखी काही कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता
हे सागवान महादेवपूर येथील सुधाकर दशरथम चिर्लावंचा याला विक्री करण्यासाठी नेले जात होते, अशी कबुली आरोपीने दिली. दरम्यान, सागवान तस्करीत जितेंद्र मडावीचा सहभाग तर आढळलाच, पण इतर काही कर्मचारीही रडारवर असून, त्यांचा सहभाग आढळल्यास कारवाई केली जाईल, असे क्षेत्र सहायक एस. एस. नीलम यांनी सांगितले.