गोदामाअभावी आरमोरीतील धान खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 22:37 IST2019-01-06T22:35:49+5:302019-01-06T22:37:01+5:30
विलास चिलबुले। लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने आरमोरी येथे यंदाच्या खरीप हंगामात धान ...

गोदामाअभावी आरमोरीतील धान खरेदी बंद
विलास चिलबुले।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने आरमोरी येथे यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र आतापर्यंत झालेल्या धान खरेदीने येथील तीन गोदाम फुल्ल झाले. आता गोदामाअभावी आरमोरी येथील या केंद्रावरील धान खरेदी बंद पडली आहे.
मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने धान खरेदीसाठी येथे तीन गोदाम मंजूर करण्यात आले. आतापर्यंत या केंद्रावर ९ हजार ६०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या धानाने तिनही गोदाम पूर्ण भरले आहेत. शासनाने गोदामातील धान्याची उचल न केल्याने पुन्हा जवळपास ३१ हजार क्विंटलची धान खरेदी शिल्लक आहे. खासगी व्यापाऱ्यांनी नगदी पैसे देण्याचे आमिष दाखवून कमी भावात धान खरेदी करण्याचा सपाटा लावला असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा स्थितीत लवकरात लवकर गोदाम उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर पाठपुरावाही केला. मात्र या मागणीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आरमोरी तालुक्यात धानाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात झाले आहे. शासनाकडून हमीभाव धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आरमोरी येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धान विक्रीसाठी आणले आहेत. त्यांनी विक्रीचा क्रमांकही लावला आहे. मात्र महिना उलटूनही काही शेतकऱ्यांचा धानाचा काटा झाला नाही. अद्यापही या केंद्रावरील ७५ टक्के शेतकरी धानविक्रीच्या प्रतीक्षेत असून मोठ्या अडचणीत सापडला आहे. लक्ष देण्याची मागणी आहे.
फेडरेशनला खासगी गोदाम देण्यास नकार
मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने आरमोरी येथील धान खरेदीसाठी खासगी गोदाम भाडे तत्त्वावर दरवर्षी घेतले जाते. यंदाही खासगी गोदामासाठी फेडरेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र फेडरेशनकडे गेल्या पाच-पाच वर्षांपासूनचे गोदाम भाडे शिल्लक असल्याने यावर्षी फेडरेशनला भाडेतत्त्वावर देण्यास अनेकांनी नकार दिला आहे. यावरून फेडरेशनचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
आदिवासी विकास महामंडळ नाशिककडून गोदाम नसलेल्या केंद्रावर खुल्या जागेत ओट्यावर धान खरेदीला परवानगी देण्यात आली असल्याने महामंडळाची धान खरेदी जोरात सुरू आहे. मात्र मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर शासनाने उघड्यावर धान खरेदीसाठी मंजुरी दिली नाही. महामंडळाच्या धर्तीवर उघड्यावर धान खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.