पुराडा येथे आरोग्य केंद्र द्या
By Admin | Updated: June 23, 2014 00:05 IST2014-06-23T00:05:34+5:302014-06-23T00:05:34+5:30
राज्यात आरोग्य संस्था स्थापन्याबाबत आरोग्य विभागाने बृहत आराखडा तयार केला असून यात विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र या आराखड्यात कुरखेडा तालुक्यातील पुराडा या नवीन

पुराडा येथे आरोग्य केंद्र द्या
कुरखेडा : राज्यात आरोग्य संस्था स्थापन्याबाबत आरोग्य विभागाने बृहत आराखडा तयार केला असून यात विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र या आराखड्यात कुरखेडा तालुक्यातील पुराडा या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाने नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करताना पुराडा आरोग्य केंद्राचा समावेश करावा, अशी मागणी पं.स. सदस्य चांगदेव फाये यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र मोठे असून या आरोग्य केंद्रावर ५४ हजार ८३३ लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार आहे. या केंद्रात दोन आरोग्य पथक व १९ उपकेंद्राचा समावेश आहे. देऊळगाव येथील आरोग्य केंद्राचे अंतर अधिक असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो.
शासनाच्या आदिवासी क्षेत्राकरिता २० हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक केंद्र असे धोरण असल्याने पुन्हा नव्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती होऊ शकते. लोकसंख्येचा निकष लावून कुरखेडा तालुक्यात पुराडा येथे व अन्य एका गावात ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी पं.स. सदस्य तथा देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोक आधारित देखरेख व नियोजन समितीचे सदस्य चांगदेव फाये यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत फाये यांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी, कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी यांना दिली आहे.
लोकसंख्येचा विचार करून शासनाने पुराडा आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिल्यास पुराडा परिसरातील आरोग्य सेवा बळकट होणार असल्याचे फाये यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)