मेडीगड्डा प्रकल्पग्रस्तांनी घरांवर लावले काळे झेंडे; मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 14:58 IST2022-11-17T14:35:17+5:302022-11-17T14:58:22+5:30
महाराष्ट्र शासनाने तेलंगणा सरकारला जाब विचारून योग्य तो न्याय द्यावा, शेतकऱ्यांची मागणी

मेडीगड्डा प्रकल्पग्रस्तांनी घरांवर लावले काळे झेंडे; मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा निषेध
कौसर खान
सिरोंचा (गडचिरोली) : तेलंगणा सरकारने तीन वर्षांंपूर्वी बनविलेल्या मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींपैकी १३८.९१ हेक्टर शेतजमिनीचे अजूनही अधिग्रहण केले नाही. त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. यासाठी जबाबदार तेलंगणा सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणाचा प्रकल्पग्रस्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध सुरू केला आहे. आरडा या गावातील सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावले आहेत.
सध्या कलम ३७ लागू असल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांना एकत्रितपणे उपोषणाला बसण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे प्रतिनिधिक स्वरूपात चार लोक साखळी उपोषण करीत असून, उर्वरित लोकांनी घरांवर काळे झेंडे लावले आहेत.
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या ३७३.८० हेक्टर शेतजमिनीपैकी तेलंगणा सरकारने २३४.९१ हेक्टर जमीन थेट खरेदी केली. त्यासाठी १०.५० लाख रुपयांप्रमाणे मोबदलाही दिला. पण आता तेलंगणा सरकारने यातून अंग काढून घेतले आहे. पण अशा स्थितीत महाराष्ट्र शासनाने तेलंगणा सरकारला जाब विचारून योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तेलंगणा सरकारने जमीन अधिग्रहणाचे नियम बदलविल्याचे सांगत पूर्वी दिलेला मोबदला देण्यास नकार दिला आहे. आम्ही त्यांना त्या बदललेल्या नियमांबद्दलचे कागदपत्र मागितले आहे. रेडीरेकनरचे दर वाढवून जमीन खरेदी केली जावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दोन्ही राज्य सरकारांनी ठरविल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळू शकतो.
श्री अंकित, उपविभागीय अधिकारी, अहेरी