‘प्रोजेक्ट विकास’मुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळ आली बॅकफूटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:00:36+5:30

मुळात आता नक्षलवाद्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यांच्या चळवळीत जाण्यासाठी युवा वर्ग तयार नाही. त्यामुळे छत्तीसगडमधील लोकांची भरती करून त्यांना इकडे पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण हे करताना गावकऱ्यांशी त्यांचा पूर्वीसारखा संपर्क राहिलेला नाही. असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे सतत त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन आपले स्थान बदलवत राहावे लागते.

‘Project Development’ brought the Naxal movement in the district on its backfoot | ‘प्रोजेक्ट विकास’मुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळ आली बॅकफूटवर

‘प्रोजेक्ट विकास’मुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळ आली बॅकफूटवर

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचा विश्वास

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम भागातील नागरिकांना नक्षल चळवळीपासून दूर नेऊन विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘प्रोजेक्ट विकास’ राबविला जात आहे. केवळ शासनाच्या योजनांची माहिती वंचित लोकांपर्यंत पोहोचवून थांबायचे नाही तर त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ त्यांना देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या पुढाकारातून केला जात आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहे. त्यामुळे नक्षल चळवळ आता बॅकफूटवर गेली आहे, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
साडेचार महिन्यांपूर्वी गडचिरोली पोलीस विभागाचे प्रमुख म्हणून धुरा स्वीकारताना गोयल यांनी या जिल्ह्यातील नक्षलवाद कमी करण्याचे आव्हानात्मक काम स्वीकारले. हे आव्हान पेलताना त्यांच्या काय योजना आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करणार याबाबत लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या. नक्षलवादाला नियंत्रित करताना एकावेळी अनेक आघाड्यांवर काम करावे लागते. नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीने उत्तर देण्यासोबत त्यांना कुठेच आश्रय मिळणार नाही अशी व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी मंदावलेल्या विकासाच्या प्रक्रियेला गती देणे हेच एक आव्हान आहे. नक्षल्यांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी ते आता दुर्गम भागातील विकासाची प्रक्रिया थांबवू शकणार नसल्याचे ते म्हणाले.
मुळात आता नक्षलवाद्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यांच्या चळवळीत जाण्यासाठी युवा वर्ग तयार नाही. त्यामुळे छत्तीसगडमधील लोकांची भरती करून त्यांना इकडे पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण हे करताना गावकऱ्यांशी त्यांचा पूर्वीसारखा संपर्क राहिलेला नाही. असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे सतत त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन आपले स्थान बदलवत राहावे लागते. यातून त्यांच्यात पूर्वीसारखी एनर्जीही राहिलेली नाही. त्यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना अटक झाली, तर काही चकमकीत मारले गेले. नक्षलवाद्यांचे मनुष्यबळच नाही तर मनोबलही कमी झाले आहे. हे पोलीस यंत्रणेचे मोठे यश असल्याचे पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले. 
जिल्ह्यात इतर गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे का, याबद्दल ते म्हणाले, ही परिस्थिती राज्यात सर्वत्रच आहे. यावर्षी कोविड-१९ मुळे निधीची थोडी कमतरता आहे. तरीही कुठलेही काम अडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ऐच्छिक ठिकाणी जाण्याची मुभा आहे. 

आत्मसमर्पितांसाठी ‘ब्रिज कोर्स’चा प्रस्ताव
आतापर्यंत ६०० वर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यातील बहुतांश लोक पाचवी ते सातवीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांना आयटीआयसारखे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यातून मध्यम मार्ग काढून त्यांना आयटीआय प्रवेशासाठी दहावीशी समकक्ष ठरेल असा ‘ब्रिज कोर्स’ करण्याची मुभा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली.

दुर्गम भागातील युवक-युवतींना रोजगार
नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील युवक-युवतींना विविध ठिकाणी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात ४०० जणांना सुरक्षा रक्षक, १५० जणांना हॉटेल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात, १५० युवतींना नर्स म्हणून नोकरी मिळवून दिली. ३१५ दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, १२० जणांना मत्स्य व कुकुटपालनाचा व्यवसाय अशा माध्यमातून जोडण्यात आले. याशिवाय दुर्गम भागात आधार नोंदणी शिबिर घेऊन योजनांचा लाभ देण्याचा मार्ग प्रशस्त केला.

 

Web Title: ‘Project Development’ brought the Naxal movement in the district on its backfoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.