A private school teacher is also headquartered at the summer holidays | उन्हाळी सुट्यातही खासगी शाळांचे शिक्षक मुख्यालयीच

उन्हाळी सुट्यातही खासगी शाळांचे शिक्षक मुख्यालयीच

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रियेचे भूत मानगुटीवर : संस्थाचालकांसह मुख्याध्यापकांचा फतवा, शिक्षकांच्या दौऱ्यांवर होतोय परिणाम

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शैक्षणिक सत्र आटोपून शालेय परिक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधीलशिक्षकांना १ मे पासून तर खासगी संस्थेअंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्याशिक्षकांना १२ मे पासून उन्हाळी सुट्या लागल्या. मात्र इयत्ता पहिली, पाचवी व आठवीची प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण न झाल्याने खासगी अनुदानित शाळांच्या शिक्षकांना उन्हाळी सुट्यातही मुख्यालयीच राहावे लागत आहे. तसे आदेश काही शिक्षण संस्थाचालकांसह मुख्याध्यापकांनी काढले आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांमध्ये शिक्षकांना मुख्यालयी राहावे लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या मिळून एकूण २५५ माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल १०, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित हायस्कूल १४५, खासगी अंशता अनुदानित २७, खासगी विनाअनुदानित ४४, खासगी व्यवस्थापनाच्या स्वयंअर्थसहाय्य १९, राज्य शासनाचे चार मॉडेल स्कूल व पाच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तसेच खासगी व्यवस्थापनाची एक सैनिकी शाळा आदींचा समावेश आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून शहरी व ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कॉन्व्हेंटची संख्या प्रचंड वाढली आहे. खासगी व्यवस्थापनाच्या मराठी माध्यमांच्या शाळा संख्येत भर पडली आहे. त्यातल्या त्यात जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांना पाचवा वर्ग जोडण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शाळांना इयत्ता पहिली, पाचवी व आठवीचे प्रवेशित विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.सदर वर्गाला विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये स्पर्धा लागली आहे.
शाळांमार्फत दरवर्षी शालेय परीक्षा आटोपल्यानंतर तसेच परीक्षेच्या काळात सायंकाळी प्रवेशित विद्यार्थी शोधमोहीम राबविली जाते. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनेक शिक्षकांना घेण्यात आले. पाच ते सात दिवस या शिक्षकांना प्रशिक्षण व निवडणुकीच्या कामासाठी द्यावे लागले. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात इयत्ता पहिली, पाचवी व आठवीचे प्रवेशित विद्यार्थी शोधण्याची मोहीम लांबणीवर पडली. दरवर्षी प्रवेशित विद्यार्थी शोधमोहीम शिक्षकांना उन्हाळी सुट्या लागण्यापूर्वीच पूर्ण केली जाते. गडचिरोली शहरासह शहरी व ग्रामीण भागातील खासगी व्यवस्थापनांच्या अनेक शाळांमध्ये इयत्ता पहिली, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची भरती १०० टक्के झाली नाही. त्यामुळे शिक्षकांमार्फत प्रवेशित विद्यार्थी शोधमोहीम अद्यापही सुरूच आहे. सदर प्रवेशित विद्यार्थी शोधमोहीम राबवून वर्ग क्षमतेनुसार विद्यार्थी प्रवेश पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे सक्त निर्देश बºयाच खासगी शिक्षण संस्थांनी मुख्याध्यापकांमार्फत शिक्षकांना दिले आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्या लागूनही शिक्षकांना जिल्ह्याच्या बाहेर जाणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रवेश क्षमतेइतके विद्यार्थी न मिळाल्यास संबंधित वर्गाला शिकविणारे शिक्षक अतिरिक्त होत असतात. अतिरिक्त होण्याची पाळी येऊ नये, विद्यार्थ्यांच्या प्रवेश मिळविण्यासाठी शिक्षक आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

जि.प.शिक्षकही आॅनलाईन कामात व्यस्त
जि.प. व न.प. शाळांच्या शिक्षकांना परीक्षांचे निकाल लागल्यानंतर १ मे पासून उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. मात्र संबंधित शाळांचे आॅनलाईन कामे शिल्लक असल्याने ही कामे आता उन्हाळ्याच्या सुट्यात अनेक मुख्याध्यापक संबंधित शाळांच्या तंत्रस्नेही शिक्षकांकडून करवून घेत आहेत. सध्या तंत्रस्नेही शिक्षक शाळांची माहिती यूडायसमध्ये अद्यावत करणे, शालार्थ वेतन प्रणालीसाठी शिक्षकांची माहिती अद्यावत करणे, ३३ कोटी वृक्षलागवड अंतर्गत खोदलेल्या खड्ड्यांचे फोटो अपलोड करणे, स्टुटंड प्रमोशन करणे आदी कामे करीत आहेत. याशिवाय शिक्षकांची बदली प्रक्रिया जवळ आली असल्याने बदल्यांच्या आॅनलाईन पोर्टलवर शिक्षकांची अद्यावत माहिती अपलोड करण्याचेही काम तंत्रस्नेही शिक्षकांकडून सध्या सुरू आहे.

शिक्षकांवर आर्थिक भुर्दंड
इयत्ता पहिली, पाचवी व आठवीचे विद्यार्थी आपल्याच शाळेत प्रवेश करावे, असा आग्रह धरून अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेत आहेत. यासाठी शिक्षकांमार्फत सायकल, रोखरक्कम व इतर प्रकारचे प्रलोभने दाखविले जात आहेत. नोकरी टिकविण्यासाठी वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे गरजेचे असल्याने यापोटी येणारा आर्थिक खर्च अनेक शिक्षक आपल्या खिशातून करीत आहेत. यामध्ये संबंधित वर्गाला शिकविणाºया शिक्षकांसोबतच अन्य वर्गाला अध्यापन करणाºया शिक्षकांचाही समावेश आहे. एकूणच प्रवेशित विद्यार्थी शोधमोहीम शाळांचे सर्व शिक्षक राबवित आहेत.

पाचवी व आठवीत २५ हजारांवर विद्यार्थी
खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील वर्ग व तुकड्या मिळून इयत्ता पाचवीसाठी जवळपास ८ हजार ४३० व इयत्ता सातवीसाठी १६ हजार ६०३ विद्यार्थी लागत आहेत. यामध्ये मुला, मुलींचा समावेश आहे. खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा मिळून या दोन वर्गांसाठी एकूण २५ हजार ४६ विद्यार्थी मिळवावे लागतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फॅड वाढल्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले असून शिक्षकांना टीसीसाठी प्रयत्न करावा लागत आहे.

Web Title: A private school teacher is also headquartered at the summer holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.