कृषीपंप वीज जोडणीस प्राधान्य द्या

By Admin | Updated: April 26, 2017 01:12 IST2017-04-26T01:12:00+5:302017-04-26T01:12:00+5:30

शासकीय योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ मिळाला आहे.

Prioritize agricultural pump connections | कृषीपंप वीज जोडणीस प्राधान्य द्या

कृषीपंप वीज जोडणीस प्राधान्य द्या

खासदारांचे निर्देश : महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक
गडचिरोली : शासकीय योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ मिळाला आहे. योजनेंतर्गत या विहिरीवर कृषीपंप बसविले जाते. कृषीपंपाच्या विद्युत जोडणीचे काम मंद गतीने सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अशा लाभधारक शेतकऱ्यांना तत्काळ सिंचन सुविधा मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील उर्वरित ३ हजार ३३९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले.
मंगळवारी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊसमध्ये खा. नेते यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये विद्युतीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गतीने हे काम करून संबंधित गावातील नागरिकांना वीज सुविधा पुरवावी, अशा सूचना खा. नेते यांनी केल्या. बैठकीला भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री जावेद अली व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, भाजप सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात विद्युतीकरणाचे अनेक काम मार्गी लागले आहेत. सदर कामाचे तत्काळ भूमिपूजन, उद्घाटन करून ही सेवा कार्यान्वित करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या २६९ गावांमध्ये विद्युतीकरण करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे. ३७ गावांमधील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती ए. ई. कांबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Prioritize agricultural pump connections