प्राथमिक शिक्षकाचे आमरण उपोषण सुरू
By Admin | Updated: August 19, 2014 23:42 IST2014-08-19T23:42:39+5:302014-08-19T23:42:39+5:30
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने मंगळवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

प्राथमिक शिक्षकाचे आमरण उपोषण सुरू
विविध मागण्या प्रलंबित : पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप
आरमोरी : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने मंगळवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी प्राथमिक शिक्षक समितीचे सल्लागार संजय बिडवाईकर हे आमरण उपोषणाला बसले आहे.
जोपर्यंत शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व समस्या मार्गी लावण्यात येणार नाही तोपर्यंत सदर आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने प्रशासनाला दिला आहे. एकस्तर वेतनश्रेणीनुसार प्राथमिक शिक्षकांचे वेतन निश्चिती करण्यात यावी, सेवेत नियमित व स्थायी केलेल्या शिक्षकांना सेवा नियमित व स्थायी केल्याबाबतच्या आदेशाची प्रत देण्यात यावी, सेवा पुस्तिकेनुसार शिक्षकांची वेतन निश्चिती पडताळणी कार्यवाही करण्यात यावी, शालांत प्रमाणपत्र परीक्षा शुल्क परतीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर न करणाऱ्या संबंधीतावर कारवाई करावी, मागास वर्गीय मुलींना देण्यात येणारा उपस्थिती भत्ता व प्राप्त रक्कमेचा ताळमेळ बसविण्यात यावा आदी मागण्यांसाठी संजय बिडवाईकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पं.स. शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिडवाईकर यांनी केला आहे. उपोषणास प्रारंभ करतेवेळी उपोषण मंडपात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, अनिल मुलकलवार, तालुकाध्यक्ष जयंत राऊत, एस. पी. मेश्राम, वसंत राऊत, भगवान हेमणे, रवी मुलकलवार, श्रीकृष्ण उईके, माया दिवटे, सोमनकर, रामजी धोटे, प्रकाश चंदणखेडे, रमेश रामटेके, सुनिल चरडुके, राजू धात्रक, मेघराज बुरांडे आदीसह शेकडो प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)