भाजी विक्रेत्यांचा आंदोलन चिघळण्याची शक्यता
By Admin | Updated: June 28, 2014 23:33 IST2014-06-28T23:33:06+5:302014-06-28T23:33:06+5:30
गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी तीन दिवस गुजरी बंद ठेवून आंदोलन केल्यानंतर रविवारचा आठवडी बाजारही बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे बाजारातील भाजीपाला विक्रेते व

भाजी विक्रेत्यांचा आंदोलन चिघळण्याची शक्यता
बाजार बंद : पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी
गडचिरोली : गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी तीन दिवस गुजरी बंद ठेवून आंदोलन केल्यानंतर रविवारचा आठवडी बाजारही बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे बाजारातील भाजीपाला विक्रेते व गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांचे भांडण होऊन वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवा, अशी मागणी गडचिरोलीचे पोलीस पाटील अनिल कवडू खेवले यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
विठ्ठल मंदिराच्या बाजुने रस्ता देण्यात यावा. या मागणीसाठी गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी बुधवारपासून गुजरी बंदचे आंदोलन सुरू केले आहे. तोडगा न निघाल्यास गडचिरोली येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजारही बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. आठवडी बाजारात ग्रामीण भागातील शेतकरी व इतर व्यापारी भाजीपाला विक्रीस आणतात. आठवडी बाजार बंद ठेवल्या शेतकऱ्यांना भाजीपाला परत न्यावा लागेल. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावा लागेल. दूरच्या व्यापाऱ्यांनाही दिवसाची रोजी बुडविण्याबरोबरच येण्याजाण्याचा त्रास सहन करावा लागेल. ग्रामीण भागातील नागरिकांनाही आल्या पावली परत जावे लागेल. बाजारात भाजीपालाबरोबरच मसाला, मिरची, शैक्षणिक साहित्य, फळ, डाळ आदी जीवणावश्यक वस्तूंची विक्री केली जाते. आठवडी बाजार बंद राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी अनिल खेवले यांनी केले आहे. गुजरीच्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे रहदारीचा मार्ग बंद झाला आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)