गरिबांना मिळणार चणा व उडीद डाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 21:39 IST2018-10-21T21:37:20+5:302018-10-21T21:39:06+5:30

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून चणाडाळ व उडीदडाळ वितरित केली जाणार आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना होणार आहे.

The poor will get chana and udid dal | गरिबांना मिळणार चणा व उडीद डाळ

गरिबांना मिळणार चणा व उडीद डाळ

ठळक मुद्देजिल्हाभरातील लाखो कुटुंबांना लाभ : स्वस्त धान्य दुकानात मिळेल सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून चणाडाळ व उडीदडाळ वितरित केली जाणार आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांना होणार आहे.
गरीब नागरिकांना शासनाकडून दोन रूपये किलो गहू व तीन रूपये किलो तांदूळ याप्रमाणे अत्यंत नाममात्र किमतीत धान्य उपलब्ध करून दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण कुटुंबांच्या जवळपास ७० टक्के लाभार्थ्यांना गहू व तांदूळ उपलब्ध होते. रोजीरोटी करणारे कुटुंब खुल्या बाजारातून धान्य खरेदी करू शकत नाही. अशा कुटुंबांसाठी स्वस्त धान्य दुकानातील धान्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. बीपीएल व अंत्योदय लाभार्थ्यांना गहू व तांदळासोबतच साखर उपलब्ध करून दिली जाते. मात्र प्राधान्य कुटुंबांना केवळ गहू व तांदळाचाच पुरवठा केला जातो. काही महिन्यांपासून प्रतिकुटुंब एक किलो तुरीची डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. ३५ रूपये किलो दराने अत्यंत चांगल्या दर्जाची डाळ उपलब्ध होत असल्याने प्रत्येक लाभार्थी आपल्या हिश्याची डाळ खरेदी करीत आहे. तुर डाळीसोबतच आता चणा व उडीद डाळ देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक संबंधित राशन दुकानदारांसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. चणा व उडीद डाळीचे एक किलोचे पॉकेट राहणार आहे. या डाळीवर राशन दुकानदाराला दीड रूपयांचे कमिशन दिले जाणार आहे. ग्राहकांना सदर डाळ पॉकेट ३५ रूपयात पडणार आहे. दुकानदार उडीद व चणाडाळ खरेदी करतील. मात्र ग्राहक उडदाची डाळ खरेदी करणार काय, असा प्रश्न आहे.
उडीद डाळ कोण खरेदी करणार?
चणा डाळीपासून विविध पदार्थ बनविले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात चणाडाळीचा वापर होतो. परिणामी चणाडाळ प्रत्येक लाभार्थी खरेदी करेल. मात्र उडीद डाळीचा पाहिजे त्या प्रमाणात वापर होत नाही. केवळ वड्या टाकण्यासाठीच उडीद डाळ वापरली जाते. त्यातही उडीदाचे दोन ते तीन प्रकार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील वावरांमध्ये पिकणाऱ्या उडीदाचा दर्जा अतिशय चांगला राहतो. त्यामुळे ग्रामीण भागातून उडीद खरेदी केले जातात. मात्र बºयाचदा दुकानात येणारे उडीद हे खरीप हंगामातील राहते. याला येले उडीद असे संबोधल्या जाते. या उडीदाची चव चांगली राहत नसल्याचा अनुभव असल्याने उडीद डाळीचे पॉकेट विकताना दुकानदारांची दमछाक होणार आहे.
एक किलो गव्हामुळे कुटुंब अडचणीत
गडचिरोली जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकाला प्रतीलाभार्थी केवळ एक किलो गहू व चार किलो तांदूळ दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी स्वत:च्या शेतातील तांदूळ उपलब्ध राहतात. स्वस्त धान्य दुकानातून गहू कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे लाभार्थ्यांना गहू खरेदी करावे लागते. इतर जिल्ह्यांमध्ये प्रती लाभार्थी दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू उपलब्ध होते. तेवढेच धान्य द्यावे, अशी मागणी आहे.

Web Title: The poor will get chana and udid dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.