पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे, इंदारामच्या तरुणाचा तेलंगणात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:21 IST2026-04-09T16:16:51+5:302026-04-09T16:21:29+5:30
Gadchiroli : तालुक्यातील इंदाराम येथील एका तरुणाचा मृतदेह महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या सिपेली गावालगत ८ एप्रिल रोजी संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Police recruitment dream unfulfilled, body of Indaram youth found in Telangana
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी: तालुक्यातील इंदाराम येथील एका तरुणाचा मृतदेह महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या सिपेली गावालगत ८ एप्रिल रोजी संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुणाल बाबुराव औतकर (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. तो पोलिस भरतीची तयारी करत होता, मात्र अचानक मृत्यू झाल्याने हे स्वप्न अधुरे राहिले.
कुणाल औतकर हा ७ एप्रिल रोजी तरुण नागेश तोरे या मित्राची दुचाकी (एमएच ३३ एके-१८६३) घेऊन तेलंगणाला गेला होता. ८ एप्रिल रोजी तेलंगणातील सिपेली गावच्या शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला. एका निर्जन ठिकाणी मृतदेह पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. मृतदेहाची उत्तरीय तपासणी तेलंगणा राज्यातील मानेपल्ली येथे केली. त्यानंतर मृतदेह इंदाराम येथे पाठविण्यात आला.
घातपाताचा संशय बळावला
कुणालचा मृतदेह ज्या स्थितीत सापडला, त्यावरून हा केवळ अपघात नसून घातपात असावा, असा संशय मृताच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर हा प्रकार घडल्याने दोन्ही राज्यांच्या पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. हा घातपात आहे की घातपाताचा बनाव रचलेला अपघात, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे इंदाराम परिसरात शोककळा पसरली असून, कुणालच्या मृत्यूचे सत्य समोर यावे, अशी मागणी होत आहे.