पोलीस पाटलांना मिळाला न्याय

By Admin | Updated: July 18, 2014 00:06 IST2014-07-18T00:06:02+5:302014-07-18T00:06:02+5:30

गावतपाळीवर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यास गृहमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली असून मानधनवाढीचे प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे

Police Patels get justice | पोलीस पाटलांना मिळाला न्याय

पोलीस पाटलांना मिळाला न्याय

मानधनात वाढ होणार : प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे गृहमंत्र्याचे निर्देश
गडचिरोली : गावतपाळीवर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यास गृहमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली असून मानधनवाढीचे प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले आहे. हंगामी पोलीस पाटलांना कायम करण्यासोबत पोलीस पाटलांच्या रिक्त पदांची लवकरच भरती करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
पोलीस पाटील संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीला आमदार दीपक साळुंखे, गृह विभागाचे प्रधान सचिव विनित अग्रवाल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महदोव नागरगोजे आदी उपस्थित होते. पोलीस पाटलांना सध्या दरमहा मिळणारे मानधन वाढून किमान ५ हजार रूपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. दोन वर्षापेक्षा अधिक काळ हंगामी पोलीस पाटील म्हणून काम करणाऱ्या कायम करण्याबरोबर पोलीस पाटील भरतीवरील बंदी त्वरित उठविण्यात येणार आहे. मृत्यू पावलेल्या किंवा वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या पोलीस पाटलांच्या वारसास या भरतीत प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील पोलीस पाटलांच्या कामाचे स्वरूप पाहता सर्व पोलीस पाटलांचा आयुर्विमा काढण्यात येणार असून विम्याच्या वार्षिक हफ्त्याची रक्कम गृह विभागामार्फत भरण्यात येईल. पुढील काळात शारीरिक सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दर दहा वर्षांनी प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर आपोआप पोलीस पाटलांच्या नेमणुका पुढे सुरू राहणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
ग्राम सचिवालयात पोलीस पाटील कार्यालयासाठी अतिरिक्त कक्ष राखून ठेवण्यासाठी गृह विभागाकडून सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांना विशेष पॅकेज देण्यासंदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. नक्षलवाद्यांच्या कारवाईत मारल्या गेलेल्या पोलीस पाटलांच्या वारसांना १० लाख रूपये तातडीची मदत व एकाला शासकीय नोकरी तसेच पोलीस पाटलांना शहीदाचा दर्जा देण्यात येईल.
नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलांना वाढीव मानधनासह मानधनाच्या दीडपट मानधन देण्यात येईल. तसेच दरमहा ५०० रूपये मासिक भत्ता दिला जाणार आहे. नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलाचे अपघाती निधन झाल्यास ५ लाख रूपये व एका वारसानाला शासकीय नोकरी दिली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Police Patels get justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.