पोलीस अधिकाऱ्यांनी शौर्याने दिला नक्षलवाद्यांशी लढा
By Admin | Updated: August 10, 2014 23:00 IST2014-08-10T23:00:30+5:302014-08-10T23:00:30+5:30
जनजागरण मेळाव्याच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन कोसमीवरून दुचाकीने परत येत असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा नक्षलवाद्यांनी पाठलाग करून गोळीबार केला. प्रत्यूत्तरादाखल पोलीस उपनिरीक्षक

पोलीस अधिकाऱ्यांनी शौर्याने दिला नक्षलवाद्यांशी लढा
अल्लाउद्दीन लालानी -धानोरा
जनजागरण मेळाव्याच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन कोसमीवरून दुचाकीने परत येत असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा नक्षलवाद्यांनी पाठलाग करून गोळीबार केला. प्रत्यूत्तरादाखल पोलीस उपनिरीक्षक अर्जुन मोहिते (३५), चंद्रकांत पाटील (३६) या दोनही पोलीस अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांशी शौर्याने लढा दिला. सदर घटना धानोरा तालुका मुख्यालयापासून ४२ किमी अंतरावर असलेल्या मगदंड पहाडीनजीक ६ आॅगस्ट रोजी घडली, अशी माहिती नागरिकांच्या चर्चेतून पुढे आली आहे.
या घटनेत सावरगाव पोलीस मदत केंद्राचे अर्जुन मोहिते व चंद्रकांत पाटील हे दोनही पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांच्यावर सध्या नागपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. नक्षलवाद्यांनी घटनेच्या दिवशी मगदंडजवळील पहाडी परिसरातून दुचाकीने कोसमीवरून सावरगावकडे परत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अर्जुन मोहिते व चंद्रकांत पाटील यांचा पाठलाग केला. नक्षलवाद्यांनी या दोघांवरही मगदंडजवळ गोळीबार केला. सदर दुचाकी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन मोहिते चालवित होते. तर चंद्रकांत पाटील मागे बसले होते. नक्षलवाद्यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत पाठलाग केल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. त्यानंतर नक्षलवादी मागावर असल्याचे पाहून पोलीस उपनिरीक्षकांनी कोटगुल मार्गावरील मंदिराजवळ दुचाकी उभी केली व जंगलाचा आधार घेतला. दरम्यान दोनही पोलीस अधिकाऱ्यांनी नक्षल्यांच्या दिशेने बंदुकाच्या फैऱ्या झाडणे सुरू केले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रत्यूत्तराचा जोर पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. कोसमी येथील जनजागरण मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी पोलीस निरीक्षक मोहिते व पाटील हे दोघेजण पोलीस सहकाऱ्याशिवाय कसे काय गेले, असाही प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे. सदर घटना सावरगावच्या चौकातील हॉटेलमध्ये घडल्याची अफवा पसरली होती. मात्र या घटनेची अधिक माहिती जाणून घेतली असता, सदर घटनाही मगदंड पहाडीनजीक घडल्याचे गावकऱ्यांच्या माहितीनुसार स्पष्ट होते.