पोलीस मदत केंद्र कुलूपबंद
By Admin | Updated: August 18, 2014 23:29 IST2014-08-18T23:29:58+5:302014-08-18T23:29:58+5:30
येथील बसस्थानकावर एक वर्षापूर्वी स्वतंत्र पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र या केंद्रात मागील सहा महिन्यांपासून पोलीसच राहत नसल्याने सदर मदत केंद्र कुलूपबंद झाले आहे.

पोलीस मदत केंद्र कुलूपबंद
गडचिरोली : येथील बसस्थानकावर एक वर्षापूर्वी स्वतंत्र पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र या केंद्रात मागील सहा महिन्यांपासून पोलीसच राहत नसल्याने सदर मदत केंद्र कुलूपबंद झाले आहे. पोलिसांचा धाक या परिसरात राहला नसल्याने महिलांच्या छेडखानीसह इतर लहान-मोठ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी किमान एका पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
गर्दीच्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर बसस्थानक, रेल्वेस्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र पोलीस मदत केंद्र निर्माण करून या ठिकाणी २४ तास पोलीस तैनात करण्याचे राज्यशासनाचे आदेश आहेत. त्यानुसार गडचिरोली येथील बसस्थानकात पोलीस मदत केंद्राची एक वर्षापूर्वी निर्मिती करण्यात आली. एसटीने यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली आहे. सुरूवातीचे सहा महिने या ठिकाणी सकाळी ९ ते ६ या कालावधीत एक पोलीस शिपाई तैनात राहत होता. त्यानंतर मात्र या ठिकाणी पोलीस तैनात करणे बंद करण्यात आले आहे. तेव्हापासून सदर पोलीस मदत केंद्र कुलूपबंद झाले आहे.
पोलीस तैनात राहत असल्यामुळे छेडखानी करू पाहणारे युवक, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांवर यामुळे नियंत्रण राहत होते. परिणामी चोरी, पॉकेटमार, छेडखानी आदी प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होते. मात्र या ठिकाणी सध्या पोलिसच राहत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. या ठिकाणी चोवीस तास पोलीस तैनात ठेवण्याचे आदेश असतांनाही गडचिरोली पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात यावा, यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली नाही. गडचिरोली पोलिसांवर नक्षल्यांसोबत लढण्याचा अतिरिक्त भार आहे. हे जरी मान्य केले तरी समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचीही जबाबदारी तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)