चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून युवकाला मारहाण
By Admin | Updated: June 5, 2014 23:59 IST2014-06-05T23:59:07+5:302014-06-05T23:59:07+5:30
स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका युवकाला चोरीच्या आरोपाखाली चौकशी करण्यासाठी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. पुन्हा पोलिसांकडून मारहाण होण्याच्या भीतीने त्या युवकाने विष

चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून युवकाला मारहाण
युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न : जिल्हा रूग्णालयात युवक भरती
धानोरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका युवकाला चोरीच्या आरोपाखाली चौकशी करण्यासाठी ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केली. पुन्हा पोलिसांकडून मारहाण होण्याच्या भीतीने त्या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास धानोरा येथे घडली.
आत्महत्येचा प्रयत्न करणार्या युवकाचे नाव आसिफ जब्बार शेख (३0) रा. इंदिरानगर, धानोरा असे आहे. सदर युवकाला तत्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या आसिफ शेख हा युवक गडचिरोली येथे उपचार घेत आहे. प्राप्त माहितीनुसार येथीलच आदिक नाथानी याने स्वत:च्या पत्नीचा मंगळसूत्र लंपास केला. या बाबत नाथानी याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार सोमवारी दिली. पोलिसांनी नाथानी याची चोरीबाबत चौकशी केली. सुरूवातीला त्याने पत्नीचे मंगळसूत्र विहिरीत फेकल्याचे सांगितले. त्यानंतर दुसर्या दिवशी आसिफ शेख याच्याकडे दिल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी आसिफ शेखला मंगळवारी चौकशीसाठी ठाण्यात बोलाविले. त्यानंतर बुधवारी सकाळी व सायंकाळी ठाण्यात बोलावून विचारपूस केली. दरम्यान त्यावेळी पोलिसांनी आसिफ शेख याला बेदम मारहाण केली, असा आरोप आसिफ शेख व त्याच्या आईने केला आहे. पोलिसांनी चोरीच्या तक्रारीबाबत कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. परत आज गुरूवारी सकाळी ११ वाजता फोन करून आसिफला ठाण्यात बोलाविले. आपल्याला पुन्हा पोलिसांकडून मारहाण होईल, या भितीने आसिफने घरीच आज गुरूवारी १0 वाजताच्या सुमारास विष प्राशन केले. सदर बाब त्याच्या आईच्या लक्षात येताच तिने शेजाराच्या मदतीने आसिफला ग्रामीण रूग्णालयात भरती केले. गुन्हा दाखल नसताना विनाकारण पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे माझ्या मुलाचे शारीरिक व मानसिक संतुलन ढासळली असल्याची खंत आसिफच्या आईने जिल्हा सामान्य रूग्णालयात व्यक्त केली. आसिफ शेख हा युवक अविवाहित असून तो टॅक्सी चालक आहे. चोरीचा गुन्हा कबूल करण्यासाठी आपल्यावर पोलिसांनी दबाव टाकला. तसेच सदर गुन्हा कबूल न केल्यास नक्षलवाद्यांचा गणवेश घालून गोळ्या घालून ठार करण्याची धमकीही धानोरा पोलिसांनी ठाण्यात दिली, असेही आसिफ शेख याने धानोराच्या ग्रामीण रूग्णालयात सांगितले. (तालुका प्रतिनिधी)