चेंजिंग रुमला छिद्र पाडून मोबाइलने चित्रीकरण करणारा शिक्षक गजाआड
By संजय तिपाले | Updated: May 15, 2023 15:59 IST2023-05-15T15:58:57+5:302023-05-15T15:59:21+5:30
एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद होताच पाेलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

चेंजिंग रुमला छिद्र पाडून मोबाइलने चित्रीकरण करणारा शिक्षक गजाआड
गडचिरोली: विद्यार्थ्यांना नितीमूल्याचे धडे देणाऱ्या एका शिक्षकाने चेजींग रुमला छिद्र पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार देसाईगंज येथे १५ मे रोजी उघडकीस आला. एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद होताच पाेलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, नंदकिशोर भाऊराव धोटे (४५,रा.कुरखेडा, ह.मु. देसाईगंज) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. तो कुरखेडा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. देसाईगंज येथे स्वत:च्या घरी त्याची पत्नी शिवणकाम करते. त्यामुळे पत्नीकडे महिलांची रेलचेल असते. कपडे बदलण्यासाठी छोटी खोली तयार केलेली आहे. या खोलीच्या भिंतीला छिद्र पाडून नंदकिशोर धोटे हा मोबाइलद्वारे महिलांचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण करत असे. यासंदर्भात एका महिलेला कुणकुण लागताच तिने देसाईगंज ठाणे गाठून फिर्याद दिली, त्यानंतर नंदकिशोर धोटेवर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, १४ मे रोजी पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी पथक रवाना केले व नंदकिशोर धोटे यास ताब्यात घेतले. १५ रोजी त्यास देसाईगंज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक युसूफ ईनामदार करीत आहेत. शिक्षकाच्या या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे.