Plan the grant properly | अनुदानाचे योग्य नियोजन करा

अनुदानाचे योग्य नियोजन करा

ठळक मुद्देपडियालजोब येथे सभा : सहा तालुक्यातील ७५ ग्रामसभांच्या बैठकीत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील पडियालजोब येथे ग्रामसभांची दोन दिवसीय संयुक्त सभा पार पडली. या सभेत जिल्ह्यातील अनुदानप्राप्त ग्रामसभांनी अनुदानाचा उपयोग रितसर करून योग्य नियोजन करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शालिनी किरंगे होत्या. मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, वृक्षमित्र स्वयंसेवी संस्थेचे मोहन हिराबाई हिरालाल, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे डॉ.सतीश गोगुलवार, केशव गुरनुले, महाग्रामसभेच्या सहसचिव कुमारी जमकातन, इजामसाय काटेंगे, सियाराम हलामी, झाडूराम हलामी, राजाराम नैताम उपस्थित होते.
आदिवासी विकास विभागामार्फत ग्रामसभांना एक वर्षात अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानाचे नियोजन करावे तसेच अडचणी आल्यास प्रशासनाची मदत घ्यावी. तसेच आदिवासी विकास विभागाकडे अहवाल पाठवावा, असे सांगण्यात आले. ग्रामसभांना अनेक वर्षांपासून अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. या अधिकारांचा वापर ग्रामसभांनी करावा, असे आवाहन उपस्थित मार्गदर्शकांनी केले. सभेत ग्रामसभांचे अध्यक्ष सचिव, वनहक्क सनियंत्रण समिती अध्यक्ष, सचिव, ग्रामसभा सदस्य व कार्यकर्ते तसेच पडियालजोब येथील महिला, पुरूष, युवक, युवती उपस्थित झाले होते. गाववासीयांनी गावात पोलो ठेवून दाखविलेल्या एकजुटीचे मान्यवरांनी कौतुक केले. दरम्यान देवाजी तोफा, मोहन हिरालाल, डॉ.सतीश गोगूलवार, केशव गुरनुले, कुमारी जमकातन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शालिनी किरंगे यांनी आमच्या गावात आम्हीच सरकार, अशी घोषणा केली. दरम्यान पडियालजोब वासीयांनी पारंपरिक आदिवासी कोयतुरांचे मांदरी नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक राजाराम नैताम, संचालन महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडुराम हलामी तर आभार मोहन हिरालाल यांनी मानले.

Web Title: Plan the grant properly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.