डॉक्टरांच्या लेटलतीफपणामुळे रुग्णांना थांबावे लागते ताटकळत; जिल्हा रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:00 IST2025-04-17T16:58:34+5:302025-04-17T17:00:47+5:30
Gadchiroli : मंजूर बेडपेक्षाही येथे रुग्णांची संख्या नेहमी जास्त असते. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कार्यरत डॉक्टरांवर भार येतो

Patients have to wait due to unpunctual doctors ; Incident in district hospitals
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गर्भवती मातांना नियमित आरोग्य तपासणी, विविध चाचण्या तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार व औषधोपचार घेणे गरजेचे ठरते. मात्र बाहेरगावावरून रुग्णालयात आल्यावर बराच वेळ पाहिल्यावर तपासणी करणारे डॉक्टर येत नसतील तर प्रतीक्षा केल्याशिवाय रुग्ण व नातेवाइकांपुढे पर्याय नसतो. असाच काहीसा प्रकार बुधवारी (दि. १६) सकाळच्या ओपीडीदरम्यान उघडकीस आला.
प्रशासनाचा ढिलेपणा व डॉक्टरांच्या लेटलतीफपणामुळे येथील रुग्णांना एक ते दीड तास तपासणी करून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र या प्रकाराकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी नाव न छापण्याच्या अटीवर 'लोकमत' कडे बोलून दाखविला.
जिल्हा महिला व बालरुग्णालयात सकाळच्या ओपीडीची वेळ ८ ते दुपारी १ वाजता अशी आहे. सायंकाळच्या ओपीडीची वेळ ४ ते ६ अशी आहे. रविवारी व सोमवारी शासकीय सुटी आल्याने दोन दिवस येथील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. त्यामुळे मंगळवारी व बुधवारी या रुग्णालयात ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी झाली. सकाळचे १० वाजायला आले तरी येथील डॉक्टर उपस्थित न झाल्याने रुग्ण प्रतीक्षा करून कंटाळले. नर्स व इतर सर्व आरोग्य कर्मचारी आपापल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर झाले. मात्र तपासणी करणारे डॉक्टर न पोहोचल्याने येथील प्रसूतीपूर्व तपासणी कक्षातील ओपीडी सुरू झाली नव्हती. बालरुग्ण विभागातही अशीच स्थिती होती. तब्बल दीड ते दोन तास उशिराने ओपीडी सुरू होत असल्याचे दिसते.
रुग्णांसाठीची लिफ्ट बंदच
सदर रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येथील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना त्रास होतो. पायऱ्या चढून वॉर्डात भरती व्हावे लागते. ही लिफ्ट केव्हा सुरू होणार, असा सवाल आहे.
"ड्यूटी असताना संबंधित डॉक्टरांनी त्या वेळेत कर्तव्यावर हजर व्हायला पाहिजे. उशिरा येणाऱ्या व कामचुकार डॉक्टरांना उद्या सूचना करण्यात येईल."
- डॉ. प्रशांत पेंदाम, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बालरुग्णालय, गडचिरोली