'अपार आयडी' नको, आश्रमशाळेतील २११ विद्यार्थ्यांना घेऊन पालक घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:38 IST2024-12-24T15:37:52+5:302024-12-24T15:38:43+5:30
संभ्रम दूर करा : मुख्याध्यापकांचे प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र

Parents take 211 students from Ashram School home without 'Apar ID'
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली / अहेरी : विद्यार्थ्यांची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण व्हावी, यासाठी 'अपार आयडी' म्हणजे ऑटोमेटेड परमानेंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री क्रमांक बनविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. तथापि, आदिवासी पालकांमध्ये 'अपार आयडी'वरून गैरसमज आहेत. आदिवासी आश्रमशाळेत शिकत असलेल्या २११ पाल्यांना घेऊन पालक २३ डिसेंबरला घरी गेले. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. एटापल्ली तालुक्यात हा प्रकार घडला आहे.
एटापल्लीच्या पंदेवाहीतील विनोबा प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेत कसनसूर, हालेवरा, बुर्गी, गट्टा, गर्दैवाडा, गट्टागुडा, ताडगुडा, हालूर, बांडे, मर्दाकुही, मुरेवाडा, गिलनगुडा, वट्टेली, मोडस्के, जवेली, झारेवाडा आदी गावांतील मुले-मुली शिकतात. एकीकडे अपार आयडी काढण्याचे शासनाचे निर्देश असून १०० टक्के अपार आयडी काढण्याबाबत शिक्षक अधिकारी आणि यंत्रणेवर दबाव आहे. मात्र, पालकांच्या विरोधामुळे अपार आयडी काढण्यास अडचणी येत असून, अनेक आश्रमशाळांची पटसंख्या दररोज कमी होत आहे.
दररोज शाळेतून पालक आपल्या पाल्यांना अपार आयडीच्या भीतीने घरी नेत आहेत. याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अधिकारी भामरागड यांना पत्र लहून कळविले असून, विद्यार्थी आदिवासी नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
संमतीशिवाय आयडी काढल्यास गुन्हा नोंदवू
दरम्यान, काही पालकांनी शाळेला लेखी पत्र लिहून संमतीशिवाय अपार आयडी काढली किंवा विद्यार्थ्यांना कुठली लस परस्पर दिल्यास विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे शिक्षक धास्तावले असून अपार आयडी बनविण्याचे काम प्रभावित झाले आहे.
शिक्षण विभागाचे पाहतो, करतो...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. पाहतो, करतो, अशी त्यांची उत्तरे आहेत. असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणणाऱ्यांनाच ते शहाणपणाचे डोस देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
संबंधित आश्रमशाळा ही आदिवासी प्रकल्पाअंतर्गत असल्याचे सांगून हात झटकण्याचाही प्रयल होत आहे. त्यामुळे अपार आयडीसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला खीळ बसण्याची शक्यता आहे. सीईओ आयुषी सिंह यांनी लक्ष देण्याची गरज आहे.