पालकांचा पं. स. समोर ठिय्या
By Admin | Updated: August 23, 2014 01:48 IST2014-08-23T01:48:18+5:302014-08-23T01:48:18+5:30
पुरेशा शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या मुद्यांवर गोठणगावच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले.

पालकांचा पं. स. समोर ठिय्या
कुरखेडा : पुरेशा शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या मुद्यांवर गोठणगावच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. शिक्षकांची नियुक्ती केल्याशिवाय पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा घेतला. याउपरही संतप्त झालेल्या पालकांनी आज शुक्रवारी पंचायत समितीचे कार्यालय गाठून तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान दोन विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या. या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने दोन शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती केली.
गोठणगाव येथील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या जि. प. उच्च प्राथमिक शाळेमध्ये १३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत सध्या चारच शिक्षक कार्यरत आहेत. काही दिवसापूर्वी या शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे एका प्राथमिक शिक्षकाकडे मुख्याध्यापकांचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आलेला आहे. प्रभार घेतलेले शिक्षक विविध कार्यालयीन कामकाज व बैठकांसाठी तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे कार्यरत तिनच शिक्षकांवर १ ते ७ वर्गाचे अध्यापन अवलंबून असते. पुरेशा शिक्षकांअभावी या शाळेतील मोठ्या वर्गांचे अनेक तास होत नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. परिणामी गेल्या चार दिवसांपासून गोठणगावची शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद आहे. संतप्त पालकांनी आज शुक्रवारी शिक्षकांच्या मागणीसाठी कुरखेडा पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान बेशुद्ध पडलेल्या इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी सुषमा नागमोती व इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी दिव्या राऊत या दोन विद्यार्थिनींना कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालण्यात हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. अखेर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन मालेवाडा शाळेच्या शिक्षिका भाविका मेश्राम व तडेगावच्या शिक्षिका एस. के. पटले या दोन शिक्षिकांची गोठणगावच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली.
पंचायत समिती प्रशासने या दोन शिक्षिकांच्या नियुक्तीचे आदेशही काढले. या आंदोलनाचे नेतृत्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण मुंगणकर, उपाध्यक्ष विद्या माकडे, उपसरपंच राम लांजेवार, भाष्कर शेंद्रे, तेजराम सहारे, तेजराम ठाकरे, किशोर तलमले व लांजेवार यांनी केले. यावेळी पालक, विद्यार्थीही उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)