पालक झटकताहेत जबाबदारी

By Admin | Updated: June 28, 2014 00:47 IST2014-06-28T00:47:42+5:302014-06-28T00:47:42+5:30

शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे.

Parenting responsibilities | पालक झटकताहेत जबाबदारी

पालक झटकताहेत जबाबदारी

गडचिरोली : शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पालक आपल्या मुलांप्रती असलेली जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसते. केवळ गुणवत्ता वाढावी, या हेतूने शिकवण्या लावल्या जातात. मात्र, त्यात सुधारणा होतेच असे नाही. उलट त्याचा मुलांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांचा पालकांशी संवाद कमी होत चालला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी शहरातील वाढत्या ‘शिकवणी कल्चर’वर प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुलांचा अभ्यास घेण्यासाठी वेळ नसल्याने, तसेच गुणवत्तावाढीसाठी पालकांचा कल खासगी शिकवण्यांकडे जास्त असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. पूर्वी ज्या मुलाला शिकवणी आहे, तो मुलगा अभ्यासात मागे असणार, असे समजले जायचे. आता मात्र ज्या मुलांना शिकवणी नाही, त्यांची गुणवत्ता कमी असते, असा समज निर्माण होत चालला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुलांच्या गुणवत्तेसाठी शाळा आणि पालकांनीच प्रयत्न करायला हवेत. शिकवणी लावून पालक विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र,त्याचा उलट परिणाम होताना दिसतो. पालकही आपली जबाबदारी झटकत असल्याचे हे लक्षण आहे. पालकांनी मुलांना घरीच जास्त वेळ दिल्यास त्यांच्यातील संवाद वाढण्यासही मदत होईल. मुलांमध्ये आत्मविश्वासही वाढीस लागेल. गंमत-जंमत करतांनाच पाल्याचाही गृहपाठ पूर्ण होईल. त्यामुळे त्याला गृहपाठाचे ओझे वाटणार नाही. पालक व पाल्यामध्ये स्रेहाचे संबंध निर्माण होण्यास मदत होईल, असे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Parenting responsibilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.