४५० वर शेततळे पूर्ण
By Admin | Updated: April 3, 2017 02:16 IST2017-04-03T02:16:43+5:302017-04-03T02:16:43+5:30
राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत

४५० वर शेततळे पूर्ण
१६७ लाख रूपयांचा खर्च : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून सिंचन
गडचिरोली : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५० वर शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेततळ्याच्या कामावर जिल्हाभरात आतापर्यंत एकूण १६७.१७ लाखांचा खर्च झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात बाराही तालुके मिळून एकूण १ हजार ५०० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाने आवाहन केल्यानंतर बाराही तालुक्यातून एकूण ४ हजार १२९ शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या लाभासाठी अर्ज सादर केले. सेवा शुल्क भरलेल्या एकूण ३ हजार ५४७ शेतकऱ्यांपैकी शासन निर्णयानुसार ३ हजार ३५१ शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या लाभासाठी कृषी विभागाने पात्र ठरविले. कृषी विभागाने १ हजार ४१२ शेततळ्याच्या कामास मंजुरी प्रदान केली. यापैकी १ हजार ३४० शेततळ्यांच्या कामास कार्यारंभ आदेश कृषी विभागातर्फे देण्यात आले. यापैकी आतापर्यंत ४११ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सद्य:स्थितीत १३३ शेततळ्याचे काम सुरू आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेची माहिती गावागावात पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून शेतकऱ्यांकडून शेततळ्याच्या लाभासाठी अर्ज सादर करण्यात आले. या शेततळ्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. याशिवाय जलयुक्त शिवार अभियानातूनही जलसंधारणाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत. शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. आता शेततळ्याच्या कामाने जिल्हाभरात वेग घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
त्रुट्यांमुळे ४३ अर्ज अपात्र
शेततळ्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनाी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केलेत. मात्र या अर्जासोबत सातबारा, शेत जमिनीचा नकाशा व इतर महत्त्वाचे दस्तावेज संबंधित शेतकऱ्याांनी सादर केले नाही. शेतकऱ्यांनी सेवा शुल्क भरूनही कृषी विभागाच्या वतीने ४३ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यातील १५, अहेरी तालुक्यातील १६ व भामरागड तालुक्यातील १२ अर्जांचा समावेश आहे. त्रुट्या पूर्ण करून पुढील वर्षात सुधारीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेततळ्यांच्या कामात गडचिरोली तालुका अव्वल
जिल्ह्यात गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक ९६ शेततळ्याचे काम संबंधित शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. त्या खालोखाल अहेरी तालुक्यात ८१, तर एटापल्ली तालुक्यात ७३, धानोरा तालुक्यात ३७ शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. इतर तालुके माघारले असून या तालुक्यांमध्ये ५ ते २० पर्यंत अशी पूर्ण झालेल्या शेततळ्यांची संख्या आहे.