संतापजनक! कबुतर चोरल्याच्या संशयातून चार चिमुकल्यांना अमानुष मारहाण
By संजय तिपाले | Updated: August 6, 2024 17:11 IST2024-08-06T17:07:56+5:302024-08-06T17:11:19+5:30
देसाईगंज तालुक्यातील घटना: व्हिडिओ व्हायरल, अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल

Outrageous! Four children brutally beaten on suspicion of stealing pigeons
गडचिरोली : कबुतर चोरल्याचा आरोप करून चार चिमुकल्यांना अमानुषपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे ६ ऑगस्टरोजी उघडकीस आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी एकाअल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे राम मंदिर परिसरात चार चिमुकल्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एक अल्पवयीन आरोपी चार चिमुकल्यांना बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. आरोपीच्या वडिलांची देसाईगंज येथे रक्त तपासणी प्रयोगशाळा असून तो अल्पवयीन आहे. या अल्पवयीन आरोपीने पीडित चिमुकल्यांवर कबुतर चोरल्याचा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांड्याने मारताना व जवळ असलेल्या सळाखिंवर त्या चिमुकल्यांना उचलून फेकून दिले. चित्रफितीत एक प्रौढ व्यक्ती सुद्धा चिमुकल्यांचा बचाव करताना दिसत आहे, परंतु आरोपी त्याचे काहीही न ऐकता चिमुकल्यांना बेदम करीत असल्याचे दिसून येत आहे. घटनेच्या तब्बल पंधरा दिवसानंतर चित्रफित सार्वत्रिक होताच देसाईगंजमध्ये संतापाची लाट उसळली. ५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पीडित बालकांचे आई-वडील, नातेवाईक व नागरिक आरोपीच्या कस्तुरबा वार्डातील घरापुढे गोळा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी जमावाला शांत करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.
गुन्हा घडला तेंव्हा आरोपी अल्पवयीन
या घटनेतील आरोपीने ४ ऑगस्ट रोजी वयाचे अठरा वर्षे पूर्ण केले आहे. मात्र, ही मारहाण झाली तेव्हा तो अल्पवयीन होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २० जुलै रोजीची आहे. त्यामुळे आरोपीची अल्पवयीन म्हणून नोंद करण्यात आली.
"ही घटना २० जुलै रोजीची असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उजेडात आले. या घटनेबाबत पीडित मुलांनी देखील त्याबद्दल कुठे वाच्यता केलेली नव्हती. गुन्ह्याच्या वेळेस आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची विधीसंघर्षग्रस्त म्हणूनच नोंद करण्यात आलेली आहे."
- अजय जगताप, पोलीस निरीक्षक, देसाईगंज