ओपन स्पेसच्या कामांना लवकरच होणार सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:06 IST2018-08-27T00:06:23+5:302018-08-27T00:06:37+5:30
शहरातील २५ ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच ओपन स्पेसच्या कामांना सुरूवात होणार आहे. खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते लांझेडा वॉर्डातील समर्थ यांच्या घराजवळील ओपन स्पेसच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

ओपन स्पेसच्या कामांना लवकरच होणार सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील २५ ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच ओपन स्पेसच्या कामांना सुरूवात होणार आहे. खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते लांझेडा वॉर्डातील समर्थ यांच्या घराजवळील ओपन स्पेसच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी नगर उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, महिला व बालकल्याण सभापती रंजना गेडाम, नगरसेविका वर्षा नैैताम, पूजा बोबाटे, रितू कोलते, लता लाटकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, गुलाब मडावी, मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोळ, मुख्याधिकारी संजीव ओहोड, नरेंद्र भांडेकर, बालाजी भांडेकर, समर्थ, भुरसे यांच्यासह लांझेडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गडचिरोली शहरात ४० पेक्षा अधिक ओपन स्पेस आहेत. मात्र या ओपनस्पेसचा विकास झाला नाही. काहींना केवळ संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे तर काहींना संरक्षण भिंतसुद्धा नाही. या ठिकाणी पावसाचे पाणी साचत होते. जवळपासचे नागरिक कचरा टाकत असल्याने घाण पसरत होती. ओपन स्पेसचा विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा,यासाठी नगराध्यक्षांसह नगर परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ओपन स्पेसच्या विकासासाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. काही ओपन स्पेसच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत ओपन स्पेसच्या कामांना सुरूवात होणार आहे.
ओपन स्पेसचा विकास होऊन या ठिकाणी बगीचा, मुलांसाठी खेळणे लागल्यास आबालवृद्धांना करमणुकीचे साधन उपलब्ध होईल. गडचिरोली नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून विकास कामे करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. शहरात नाली बांधकाम, रस्ता बांधकाम, ओपन स्पेसचा विकास आदी कामांना सुरूवात होईल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन खा. अशोक नेते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.