वन कर्मचारी संपावर
By Admin | Updated: August 25, 2014 23:58 IST2014-08-25T23:58:54+5:302014-08-25T23:58:54+5:30
वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात यावी, वन संरक्षणात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध

वन कर्मचारी संपावर
जंगल वाऱ्यावर : संपात शेकडो कर्मचारी सहभागी
गडचिरोली : वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात यावी, वन संरक्षणात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी वनरक्षक, वनपाल व अन्य वनकर्मचाऱ्यांनी सोमवार दि. २५ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. गडचिरोली वन विभागातील शेकडो वनकर्मचारी संपावर गेले आहेत.
वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात आज सोमवारला राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागातील वनकर्मचारी २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. राज्यातील वनरक्षक व वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने १९७६ पासून सुरू असूनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्षित केली जात आहे. मागील ३० वर्षांपासून वनमंत्री, वित्तमंत्री, वनराज्यमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी वेतन श्रेणी संदर्भात वारंवार चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेच्यावतीने निवेदन देऊन मागणी निकाली काढण्याची विनंतीही करण्यात आली. मात्र राज्यशासनाने वनरक्षक व वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा केली नाही.
यावेळी वनरक्षक व वनपाल संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी वनरक्षक, वनपाल, वनमजूर संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्यावतीने वेतन श्रेणी व अन्य विविध मागण्यांसाठी आज २५ आॅगस्टपासून सर्व वनकर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याचे माहितीचे पत्रही मुख्य वनसंरक्षकांना देण्यात आले.
या संपात वनरक्षक, पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष किशोर सोनटक्के, केंद्रीय संघटक सुनील सोनटक्के, गडचिरोली जिल्हाध्यक्ष अरूण पेंदोरकर, विनोबा गराडे, मोतीराम चौधरी, संघटनेचे केंद्रीय सहसचिव गाजी शेख, रामचंद्र भनारकर, सुनिल पेंदोरकर, प्रकाश नैताम, रवी पेद्दीवार, अतुल धात्रक, गुरूदास टेकाम, सतिश मुच्चलवार, भाष्कर शेंडे, रेहाना शेख, कल्पना नैताम, नंदगीरीवार, दिकोंडवार, अनंता ठाकरे, राठोड, बन्सोड, आदे, अनिल सदुलवार, चव्हाण, राऊत, रेभणकर आदींसह शेकडो वन कर्मचारी सहभागी झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)