हिंदेवाडा वनव्यवस्थापन समितीने तयार केली नर्सरी
By Admin | Updated: June 19, 2014 23:50 IST2014-06-19T23:50:22+5:302014-06-19T23:50:22+5:30
राज्य सरकारने ग्रामपंचायतींमार्फत शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेंतर्गत अनेक ग्रामपंचायती पावसाळ्यात वृक्षलागवड करणार आहे.

हिंदेवाडा वनव्यवस्थापन समितीने तयार केली नर्सरी
भामरागड : राज्य सरकारने ग्रामपंचायतींमार्फत शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेंतर्गत अनेक ग्रामपंचायती पावसाळ्यात वृक्षलागवड करणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शासनाचे चार ते पाच विभाग एकत्र येऊन वृक्षलागवड कार्यक्रम राबवित आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर रोप लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक वनव्यवस्थापन समित्यांनी पुढाकार घेत नर्सरी तयार केली आहे. भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा वनव्यवस्थापन समितीने भामरागड येथील वनविभागाच्या विश्रामगृहातच नर्सरी तयार केली आहे. या नर्सरीमध्ये ३३ ते ३५ हजार रोप ठेवण्यात आले आहे. यामध्ये बेहडा, अमलतास, कवठ, बेल, गुलमोहरा, आगरेचिंच, शिवण, काशिद आदी वृक्षाचे रोप आहेत. या नर्सरीतील रोपांना उन्हाळ्याच्या दिवसातही नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा, म्हणून पामुल गौतम नदीपात्रातून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात पाण्याची टाकीही नर्सरीसाठी तयार करण्यात आली आहे. या नर्सरीची देखभाल करण्याचे काम देवाजी बिचंगा आत्राम यांच्याकडे देण्यात आले आहे. ते व त्यांच्या पत्नी दररोज या नर्सरीतील वृक्षाची निगा राखण्याचे काम करीत आहे. याशिवाय वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात लावण्यात आलेल्या विविध वृक्षांचीही देखभाल ते करीत आहे. हे रोप पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपणासाठी दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली. (तालुका प्रतिनिधी)