आता गडचिरोलीतही 'निसर्ग सफारी'; वनपर्यटकांसाठी गुरवळाजवळ नवीन आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 07:30 AM2021-12-11T07:30:00+5:302021-12-11T07:30:02+5:30

Gadchiroli News घनदाट जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता पर्यटकांच्या सेवेत वनविभागाने ‘निसर्ग सफारी’ उपलब्ध करून दिली आहे.

Now 'nature safari' in Gadchiroli too; A new attraction near Gurwala for forest tourists | आता गडचिरोलीतही 'निसर्ग सफारी'; वनपर्यटकांसाठी गुरवळाजवळ नवीन आकर्षण

आता गडचिरोलीतही 'निसर्ग सफारी'; वनपर्यटकांसाठी गुरवळाजवळ नवीन आकर्षण

googlenewsNext

हरीश सिडाम

गडचिरोली : घनदाट जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता पर्यटकांच्या सेवेत वनविभागाने ‘निसर्ग सफारी’ उपलब्ध करून दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या धर्तीवरील ही सफारी गडचिरोलीपासून अवघ्या १२ किलोमीटर असलेल्या गुरवळाजवळील जंगलात राहणार आहे. त्यामुळे हे नवीन वनपर्यटनस्थळ गडचिरोली जिल्ह्यासह इतर भागांतील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. शुक्रवारी या पर्यटन केंद्राचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

गडचिरोली वनविभाग, गुरवळा वन संयुक्त व्यवस्थापन समिती आणि हिरापूर वन संयुक्त व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटकांना ‘गुरवळा नेचर सफारी’ घडविली जाणार आहे. गुरवळा गावापासून २ किमी अंतरावर पोटेगाव रस्त्यावर या सफारीचे प्रवेशद्वार आहे. निसर्ग सफारीचा आनंद घेण्यासाठी येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना वन औषधी उद्यान, वन्यजिवांसह विविध प्रजातींच्या वनस्पतींचे निरीक्षण करता येईल. निसर्गाचे विलक्षण नजारेही येथे पाहायला मिळतील. त्यामुळे ही निसर्ग सफारी पर्यटकांना नक्कीच भुरळ पाडणार आहे.

या लोकार्पणप्रसंगी उपवनसंरक्षक डॉ. एस. आर. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, गुरवळाच्या सरपंच दर्शना भोपये, उपसरपंच प्रकाश बांबोळे, शिरपूरचे सरपंच दिवाकर निसार यांच्यासह संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नऊ तरुण मार्गदर्शकाच्या भूमिकेत

गुरवाळा नेचर सफारीला येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निसर्ग सफारीची सविस्तर माहिती देण्यासाठी गुरवळा, मारकबोडी, हिरापूर, येवली, मारोडा आदी गावांतील नऊ तरुणांना येथे मार्गदर्शक म्हणून ठेवण्यात आले आहे. हे गाइड पर्यटकांना सोबत घेऊन जंगलात सफारी करणार आहेत.

सफारीत ५२ किलोमीटरचा फेरफटका

गुरवळा नेचर सफारी घनदाट जंगल परिसरात असेल. या सफारीचे एकूण क्षेत्रफळ ३७३२ हेक्टर आहे, म्हणजे सुमारे ५२ किमी अंतर या सफारीत कापता येईल. संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे सहा तास लागतील. या ठिकाणी आठ खोल्याही बांधण्यात आल्या आहेत.

१७ प्रकारच्या वन्यजिवांचे होणार दर्शन

'गुरावळा नेचर सफारी'दरम्यान १७ प्रकारचे विविध वन्यजीव पाहता येणार आहेत. यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, रानकुत्रा, कोल्हा, हायना, रानडुक्कर, तडस, चितळ, चौसिंगा, भेकड, सायल, माकड, नीलगाय, मोर, रानकोंबडी यासह इतर वन्यप्राण्यांच्या दर्शनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. याशिवाय ४० विविध प्रकारच्या झाडांच्या प्रजातींचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच १४ विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहितीही उपलब्ध होणार आहे. त्यात प्रामुख्याने रिठा, गुडवेल, बेल, गुंज, कडुनिंब, सर्पगंधा, कणेर, निरगुडी, खंडू चक्का, पानफुटी, तुळशी, शतावरी, लेंडी पिपरी, हाडांची जोड इत्यादीचा समावेश आहे.

Web Title: Now 'nature safari' in Gadchiroli too; A new attraction near Gurwala for forest tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन