तीन दिवसात अतिक्रमण हटविण्याची नोटीस
By Admin | Updated: June 4, 2014 00:04 IST2014-06-04T00:04:08+5:302014-06-04T00:04:08+5:30
शहरातील मुख्य मार्गावरील व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई वर्षातून एकदा केली जाते. यानुसार मुख्य मार्गावर व्यावसायिकांनी रस्त्यावरती केलेले बांधकाम व शेड तोडल्या जात होते.

तीन दिवसात अतिक्रमण हटविण्याची नोटीस
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावरील व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई वर्षातून एकदा केली जाते. यानुसार मुख्य मार्गावर व्यावसायिकांनी रस्त्यावरती केलेले बांधकाम व शेड तोडल्या जात होते. परंतु यंदा पालिका प्रशासनाने चंद्रपूर मार्गावरील वार्ड क्रमांक १५ परिसरातील मुख्य मार्गावर अतिक्रमण करून बांधलेले घर व व्यावसायिकांनी थाटलेले दुकान हटविण्यासाठी पालिकेने ३१ मे रोजी तीन दिवसात अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिली आहे. परंतु पालिकेच्या या निर्णयाचा ७0 ते ८0 व्यावसायिकांनी विरोध केला असून पालिकेविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील वार्ड क्रमांक १५ पासून कॉम्प्लेक्स परिसरात राहणार्या अनेक घरमालक व व्यावसायिकांना नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांद्वारा अतिक्रमण हटावची नोटीस बजाविण्यात आली आहे. हटविण्यात येणार्या दुकान व घरांवर पालिका प्रशासनाने चिन्हही रेखांकीत केले आहे. ज्या ठिकाणी घर नाहीत अशा ठिकाणी खुंट्या मारण्यात आल्या आहेत. वार्ड क्रमांक १५ मध्ये राहणार्या इंदिराबाई धकाते यांच्या घरापासून कॉम्प्लेक्स परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण हटविण्यासंदर्भात चिन्ह रेखांकीत करून अतिक्रमण हटविण्याची सूचना पालिकेने दिली आहे. परंतु या परिसरात एकही घर कच्चे नाहीत. या परिसरात खासगी व्यावसायिकांचे कार्यालय व एक खासगी दवाखानाही आहे. ३१ मे रोजी पालिका प्रशासनाने संबंधितांना तीन दिवसात अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजाविली होती. अतिक्रमण न हटविल्यास प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येईल, तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा खर्च घरमालक अथवा व्यावसायिकांकडून वसूल करण्यात येईल, असे पालिकेने नोटीसमध्ये बजाविले होते. परंतु वार्ड क्रमांक १५ मधील अतिक्रमण हटविल्यास आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशनचे अध्यक्ष बाशीद शेख यांनी दिला आहे. या संदर्भात आमदार, खासदार, जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)